मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या दरात सतत वाढ होत आहे. सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. आज सोमवारी देशभरात पेट्रोल २९ पैसे तर डिझेल ३२ पैशानी महागले आहे. या दरवाढीसह मुंबईत पेट्रोलचे दर ९५.४६ रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर ८६.३५ रुपयांवर पोहेचले आहेत.
राज्यात परभणीमध्ये पॉवर पेट्रोलचा भाव १००.१६ रुपये झाला आहे. तर पेट्रोल सर्वाधिक ९७.४५ रुपये आहे. परभणीत एक लिटर डिझेलचा भाव ८६.९५ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ८८.९९ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ७९.३५ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९१.१९ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८४.४४ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोल ९०.२५ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८२.९४ रुपये झाला आहे.बंगळुरात पेट्रोल ९१.९७ रुपये असून डिझेल ८४.१२ रुपये झाला आहे.
इंधन कसे महाग होते?
परदेशी बाजारातून कच्चे तेल अत्यंत स्वस्त किंमतीत मिळते. पेट्रोल पंपावर येता येता ते महाग होतं. त्यात कोणते कर जोडले जातात? भारत पेट्रोलियम पदार्थ आपल्या गरजेजनुसार आयात करतो म्हणजे दुसर्या देशातून खरेदी करतो. तेल आयात केल्यानंतर ते रिफायनरीला पाठवले जाते. येथे या कच्च्या तेलामधून पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थ काढले जातात. रिफायनरीमधून हे तेल पेट्रोल आणि डिझेल विकणार्या कंपन्यांना जाते. जसे इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम. या कंपन्या त्यांचा नफा काढून घेतात. या कंपन्या पेट्रोल आणि डिझेल पेट्रोल पंपावर वाहतूक करतात, त्यानंतर पेट्रोल पंप मालक देखील विकताना कमिशन घेतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत २ प्रकारचे कर देखील जोडले जातात. केंद्र सरकारची उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारांचं व्हॅट. व्हॅट म्हणजेच मूल्यवर्धित कर दर जो प्रत्येक राज्यात वेगळा असतो. हे सर्व जोडल्यानंतर कच्च्या तेलाची किंमत तीनपट महाग होते.