सोलापूर (वृत्तसंस्था) सध्या बार्शी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे ‘विशाल फटे’. त्याला कारणही तसंच आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमधून मोठा नफा कमवून देण्याचं आमिष दाखवून विशालने बार्शी, सोलापूरातील अनेकांना करोडोंचा गंडा घातला आहे. नुकताच फटे याने एका व्हिडीओच्या माध्यमातून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार असल्याचे सांगितले आहे.
बार्शीकरांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला विशाल फटे स्वतःहून पोलिसांसमोर शरण येणार आहे. तसे स्पष्टीकरण खुद्द विशालने केले आहे. याबाबतचा एक व्हिडिओ त्याने यूट्यूबवर अपलोड करुन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आपण जो व्यवसाय केला त्यात कुटुंबातील कुठल्याच सदस्याचा सहभाग नव्हता. फक्त कागदोपत्री ते संचालक होते. असा खुलासा यानिमित्ताने फटे याने केला आहे. ज्यांचा मनी मल्टिफिकेशनवर विश्वास बसत नाही त्यांनी ट्रेंडिंग व्हीवच्या पेड प्लॅनमध्ये जाऊन राहुल कृष्णाच्या फंडयाचा अभ्यास करावा. आपणही तो करत होतो. पण आपल्याला वेळ कमी मिळाला त्यामुळं सारं संपलं.’ असं फटे याने आपल्या व्हिडीओत म्हटलं आहे.
शेअर मार्केट अल्गोरिदमच्या नावाखाली बार्शीतल्या असंख्य नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप विशाल फटेवर आहे. त्याच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात आतापर्यंत ६८ गुंतवणूकदारांनी फसवणुकीची फिर्याद दिली आहे. त्यात जवळपास १८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
विशाल फटे या तरुणाने बार्शी आणि सोलापूरमधील अनेक जणांना कोट्यवधी रुपयांना फसवलं आहे. याचप्रकरणी सगळ्यात आधी दीपक आंबरे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात विशाल फटे याने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र, आता याप्रकारणी जवळजवळ ७० हून अधिक जणांनी आपली फसवणूक झाल्याचं म्हटलं आहे. विशाल फटे हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातील आहे. त्याचे वडील बार्शीतील एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून तो बार्शीतच राहत होता. या दरम्यान तो विशाल कन्सलटन्सी सर्व्हिसेस लि. नावाच्या कंपनीच्या माध्यमातून बार्शी आणि सोलापूर परिसरात काम करत होता.
सुरुवातीला विशालने दीपक आंबरे याला शेअर मार्केटबद्दल काही माहिती दिली आणि त्यांच्याकडून पहिल्यांदा ७० हजार रुपये घेतले. पहिल्याच महिन्यात विशालने दीपकला तब्बल एक लाख रुपये परत केले. त्यामुळे दीपकचा विश्वास वाढला. यामुळे दीपकने स्वत:सह नातेवाईकांचे पैसे देखील विशालकडे गुंतवले. जवळपास ५ कोटी रुपये दीपकने विशालकडे गुंतवले. याच वेळी बार्शीतील अनेकांनी विशालकडे पैसे गुंतवले होते. पण आता या सगळ्यांचे पैसे बुडाले आहेत. त्यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेतली आहे.