शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि होमगार्ड हे जेवणासाठी शिवकॉलनीजवळील एका हॉटेमध्ये गेले होते. त्यांच्या समोरील टेबलावर बसलेल्यांना पोलिस कर्मचाऱ्याने हळू बोला असे सांगितले. त्याचा राग आल्याने त्यांच्यामध्ये तुफान राडा झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. यावेळी टोळक्याने केलेल्या हल्ल्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या डोळ्याजवळ दुखापत झाली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रारीची नोंद करण्यात आली असून जखमी पोलिस कर्मचाऱ्यासह होमगार्डवर खासगी रुग्णालयात उपचार सुर आहे.
गेल्या काही महिन्यांपुर्वी जून्या वादातून कालिंका माता चौफुली परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या हॉटेलमध्ये तरुणाचा निर्घण खून केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतांनाच रात्री उशिरापर्यंत महामार्गात सुरु असलेल्या शिवकॉलनी जवळील हॉटेल स्वाद येथे रामानंद नगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी नितेश बच्छाव होमगार्ड शरद साळवे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. यामध्ये रामानंद नगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी बच्छाव हे होमागार्डसोबत शिवकॉलनीजवळील हॉटेल स्वाद येथे जेवणासाठी गेले होते. ते ज्याठिकाणी जेवणाला बसले त्या समोरील टेबलावर काही जण दारु पित होते. त्यांच्यात मोठमोठ्या बोलणे सुरु असल्याने त्याचा त्रास पोलिस कर्मचाऱ्याला झाला.
समजवण्यासाठी गेलेल्या होमगार्डला झाली शिवीगाळ
जेवणासाठी गेलेल्या पोलिसाने त्या टोळक्याला हळू बोला असे खडसावून सांगितले. मात्र तरी देखील त्यांच्याकडून गोंधळ केला जात असल्याने होमगार्ड हा त्या टोळक्याच्या टेबलाजवळ गेला. मात्र टोळक्याने त्याला शिवीगाळ केली. टोळक्याने पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड यांना बेदम मारहाण करीत जखमी केले. तसेच त्यांच्या डोक्यात खुर्च्छा टाकल्याने पोलिस कर्मचाऱ्याच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
शाब्दिक वादानंतर झाली हाणामारी
टोळक्याने होमागार्डला शिवीगाळ केल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचारी नितेश बच्छाव हे त्याठिकाणी गेले. त्यांचा आणि टोळक्यात शाब्दिक बोलणे सुरु असतांना त्यांच्यातील वाद आणखीच वाढला. त्यानंतर दोघांमध्ये तुंबळ हाणामारी देखील झाली.