जळगाव प्रतिनिधी : मुलाचे लग्नासाठी चाळीसगाव येथे गेलेल्या शरिफ मुराद खाटीक (वय ५२, रा. सुप्रिम कॉलनी) यांच्या बंद असलेल्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने असा एकूण ४९ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. १३ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सुप्रिम कॉलनीत शरीफ मुराद खाटीक (वय ५२) हे वासतव्यास असून त्यांचा मोठा मुलगा अकील शरिफ खाटीक हा लहानपणापासून चाळीसगाव येथे त्याच्या मामाकडे राहतो. दि. १६ डिसेंबर रोजी त्याचे लग्न असल्यामुळे दि. १३ डिसेंबर रोजी खाटीक कुटुंबिय चाळीसगाव येथे गेले होते. यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या बंद असलेल्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच घरातील कपाटाचे लॉकर तोडून चोरट्यांनी त्यामध्ये ठेवलेले ३६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व १३ हजार ३०० रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण ४९ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
शेजारच्यांनी दिली घरफोडीची माहिती
दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास खाटीक यांच्या शेजारी राहणारे जुनेद शरिफ खान व इकबाल पटेल यांनी फोन करुन तुमच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा आणि कुलूप ) तुटले असून मागचा दरवाजा देखील अर्धवट तुटलेला दिसत असल्याचे सांगितले.
चाळीसगावहून परतल्यानंतर दिली पोलिसात तक्रार
घरात चोरी झाल्याचे समजताच खाटीक कुटुंबिय तात्काळ घरी परतले. त्यांनी घरात जावून बघितले असता, त्यांना घरातील कपाट उघडे होते आणि त्यातील साहित्य चोरट्यांनी घरात अस्ताव्यस्त फेकले असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे खाटीक यांना घरात चोरी झाल्याची खात्री झाली. त्यांनी दि. १४ रोजी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण चौधरी करीत आहेत
सराईत बंदर अन् काल्या एलसीबीकडून जेरबंद
ही घरफोडी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार शकील शेख ताजुद्दीन शेख उर्फ बंदर (रा. कासमवाडी) व साहील शहा सद्दाम शहा उर्फ काल्या (रा. तांबापुर) यांनी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक शरद बागल, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ अक्रम शेख, विजय पाटील, किशोर पाटील, राहुल रगडे, रविंद्र कापडणे, गोपाल पाटील यांच्या पथकाने दोघांना कासमवाडीतून अटक केली. त्यांना पुढील कार्यवाहीसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.















