नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली हरियाणा टिकरी सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जात असलेल्या पश्चिम बंगालमधील एका सामाजिक कार्यकर्तीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, ३० एप्रिल रोजी तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी बहादूरगढ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २६ वर्षीय महिला सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत होती. ११ एप्रिल रोजी दिल्लीतील टिकरी बॉर्डर येथे शेतकरी आंदोलन करणार होते. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी ही महिला पश्चिम बंगालमधून दिल्लीकडे निघाली होती. यावेळी आरोपी पुरुष तिच्यासोबत प्रवासात होता.
याप्रकरणी संयुक्त किसान मोर्चानं निवेदन प्रसिद्ध केले आहे. आरोपीनं दिल्लीतील टिकरी बॉर्डरजवळ पोहोचल्यानंतर महिलेवर हल्ला केला आणि बलात्कार केला. या घटनेच्या एका आठवड्यानंतर महिलेला कोरोनाची लक्षणं दिसून आली. त्यानंतर पीडितेला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला, असं संयुक्त किसान मोर्चानं म्हटलं आहे.