मुंबई (वृत्तसंस्था) ‘महाआवास अभियान-ग्रामीण’ अंतर्गत राज्यात येत्या १५ डिसेंबर रोजी हा दिवस ‘घरकुल मंजूरी दिवस’ म्हणून तर २० डिसेंबर हा दिवस ‘प्रथम हप्ता वितरण दिवस’ म्हणून अंमलबजावणी करण्याचे ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी घोषित केले.
राज्यात २० नोव्हेंबर, २०२० ते 28 फेब्रुवारी, २०२१ या १०० दिवसांच्या कालावधीत ‘महाआवास अभियान-ग्रामीण’ राबविण्यात येत आहे. याचा मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), गटविकास अधिकारी (पंचायत समिती) सहभागी झाले होते. मंत्री मुश्रीफ यांनी अभियानातील आतापर्यंतची प्रगती बघता अभियान काळात ८ लक्ष घरकुले पूर्ण करावयाची असल्याने प्रथम १०० टक्के मंजूरी व पहिला हप्ता वितरणावर लक्ष केंद्रीत करावयाच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या. अभियानातील सर्व १० उपक्रमावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या. विशेषत: त्यातील १०० टक्के घरकुल मंजूरी व मंजूर घरकुलांना पहिला हप्ता या उपक्रमांवर दि.१५ डिसेंबर व दि. २० डिसेंबर पर्यंत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. अभियान १०० दिवसात यशस्वी करावे, असे आवाहन केले.
ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाचे संचालक डॉ. राजाराम दिघे, कोल्हापूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारीअमन मित्तल, पुणे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, राज्य व्यवस्थापन कक्षाचे उपसंचालक निलेश काळे, उपसंचालक मंजिरी टकले, सहाय्यक संचालक संतोष भांड व राज्य समन्वय राम आघाव उपस्थित होते.