मुक्ताईनगर (प्रतिनिधी) जिल्ह्याच्या राजकारणात (Jalgaon Politics) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना ठाण्यात ट्रिटमेंटची गरज असल्याचं म्हंटल होतं. त्यानंतर आता खडसे यांनी गिरीश महाजनांना उत्तर दिलं आहे. “गिरीश महाजन यांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावं लागेल”, अशी शब्दात एकनाथ खडसे यांनी टोला लगावला आहे.
कालच नाथाभाऊंनी ”मोक्काच्या भितीने गिरीश महाजनांना कोरोना झाला का ?” असा प्रश्न केल्यानंतर आ. महाजन यांनी त्यांना ठाण्याच्या ट्रिटमेंटची गरज असल्याची टीका केली होती. यावरून नाथाभाऊंनी ठाण्यावरून थेट बुधवार पेठेचाच दाखल दिल्याने दोन्ही नेत्यांमधील शब्दयुध्दाचा भडका उडाला आहे.
मोक्का कायद्याची चौकशी होणार असल्याचे समजताच महाजनांना कोरोना
काही महिन्यांपूर्वी एकनाथराव खडसे यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला असता आ. गिरीश महाजन यांनी, ‘ईडीच्या तारखा पाहून खडसेंना कोरोना होतो’ अशी टीका केली होती. शनिवारी आ. गिरीश महाजन यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्यानंतर खडेसे यांनी त्यावर प्रतिक्रिया देते वेळी म्हटले होते की, मला तर खरोखर कोरोना झाला होता परंतु सध्या मोक्का कायद्याची चौकशी होणार असल्याचे समजते. त्यामुळेच गिरीश महाजन यांना कोरोना झाला असावा असा मला संशय असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले होते.
गिरीश भाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावे लागेल
खडसेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत आ. महाजन यांनी त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले होते. ‘नाथाभाऊंना ठाण्याच्या उपचाराची गरज आहे. राज्यात तुमचेच सरकार असून याच सरकारने दिलेली चाचणी खोटी आहे हे त्यांनी सिद्ध करावे असे खुले आव्हान आ.महाजन यांनी दिले होते. महाजनांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देत खडसेंनी जहरी टीका केली असून ‘नाथाभाऊला ठाण्याला पाठविण्याची गरज नसून गिरीश भाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावे लागेल’ असे ते म्हणाले.