नागपूर (वृत्तसंस्था) कथित प्रेयसीचा विनयभंग केल्याने संतापलेल्या प्रियकराने एकाचा खून केल्याची घटना तालुक्यातील पारडसिंगा येथे घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही घटना ४ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली. मंगेश अशोक गायकवाड (३२, रा. पारडसिंगा ) असे मृतकाचे तर ज्ञानेश्वर उर्फ नाना वानखेडे असे आरोपीचे नाव आहे.
ज्ञानेश्वरचे एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध आहे. मंगेशने तिचा विनयभंग केल्याचे कळताच ज्ञानेश्वरने तिच्या घराजवळ मंगेशसोबत भांडायला सुरुवात केली. भांडण विकोपास जाताच ज्ञानेश्वरने मंगेशच्या छातीवर चाकूने वार केले. दरम्यान, चरणदास वसंतराव तांगडे (वय ४०, रा. बाजारपेठ, ता. काटोल) याने भांडणात मध्यस्थी करीत ज्ञानेश्वरला पकडण्याचा प्रयत्न केला. या धावपळीत ज्ञानेश्वरने चरणदासवर चाकूने वार केल्याने तोदेखील गंभीर जखमी झाला.
मंगेश खाली कोसळताच आरोपी ज्ञानेश्वरने घटनास्थळाहून पळ काढला. काटोल पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बापू गंगाधर रोहोम, पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम, प्रवीण पवार, भोजराज झाडे, भारती सुरजुसे, संध्या पवार यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. जखमी चरणदास तागडेवर शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नागपूरला हलविण्यात आले. याबाबतचे वृत्त आज स्थानिक माध्यमांनी दिले आहे.