जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत ४ हजार १५६ शेतकऱ्यांकडून १ लाख ४१ हजार क्विंटल ज्वारी खरेदी झालेली आहे. यंदा जिल्ह्यासाठी १ लाख ९० हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट होते. दरम्यान, जिल्ह्यातील कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी पुन्हा एकदा ज्वारी खरेदीला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहितदादा निकम आणि जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी दिली. ज्वारीची खरेदीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ६० कोटी ४२ लाख रुपये पडणार आहेत.
जिल्ह्याभरात ५ हजार ३२७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३१ ऑगस्टपर्यंत ४ हजार १५६ शेतकऱ्यांकडून ज्वारी खरेदी करण्यात आली होती. तर १,१७१ शेतकऱ्यांकडून ज्वारी खरेदी करण्याचे बाकी होते. ज्वारी खरेदीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत होती. मात्र, अद्यापही अनेक शेतकऱ्यांकडे माल शिल्लक असल्याने, केंद्र शासनाकडून ३० सप्टेंबरपर्यंत खरेदीसाठी विशेष परवानगी आणली असल्याची माहिती रोहितदादा निकम आणि संजय पवार यांनी दिली.
ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, व त्यांच्याकडे ज्वारी शिल्लक आहे, अशा शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर एसएमएस प्राप्त होताच आपला माल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन रोहित निकम यांनी केले आहे. दरम्यान, पुन्हा एकदा मुदतवाढ वाढविणे सोपे नव्हते. परंतु शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून उद्दीष्ट्ये वाढवून आणले, यासाठी जिल्ह्यातील मंत्री ना. गिरीष महाजन, ना. अनिल पाटील, ना. गुलाबराव पाटील यांच्यासह आ. मंगेश चव्हाण, आ. संजय सावकारे, संजय पवार यांचे सहकार्य लाभल्याचेही श्री. निकम म्हणाले.