जळगाव (प्रतिनिधी) पत्नीच्या नावे असलेले खासगी वाहन कर सहाय्यक अधिकाऱ्याने वस्तू व सेवाकर (जीएसटी) विभागात लावल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केली होती. या तक्रारीची प्रशासनाने तात्काळ दखल घेत संबंधित कर सहाय्यक अधिकारी तुकडूदास नाईक यांची अकार्यकारी विभागात बदली केली. तसेच त्या वाहनाचा करार रद्द करुन ते वाहन आरटीओ विभागात जमा केले आहे.
शहरातील वस्तू व सेवा कर विभागातील अधिकाऱ्याने त्याच्या पत्नीच्या नावावर असलेली (एमएच १९, ईजी ९४२०) क्रमांकाची चारचाकी वाहन हे त्याच कार्यालयातील शासकीय अधिकाऱ्यांच्या वापरासाठी भाडेतत्वावर लावली होती. ते वाहन प्रत्यक्षात कमी किलोमीटर चालवली जात असताना, बिलामध्ये मात्र जास्त किलोमीटर दाखवून शासकीय मालमत्तेची लूट केली जात होती. तसेच ते वाहन खासगी पासिंगचे असूनही त्याचा व्यावसायिक वापर होत असल्याने शासनाचा कर महसूलही बुडत असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जीएसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीमुळे जीएसटी कार्यालयात खळबळ माजून गेल्याने या
तक्रारीची अधिकाऱ्यांनी तात्काळ गंभीर दखल घेत चौकशी केली.
करार रद्दसह वाहन आरटीओ विभागात केले जमा
या तक्रारीची जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गंभीररित्या दखल घेत नाईक यांच्या पत्नीच्या नावावर असलेला मे. दर्शन टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ सोबतचा वाहन करार तात्काळ रद्द केला. तसेच ते वाहन दि. २७ जून पासून परिवहन विभागात जमा करण्यात आले असून त्या अधिकाऱ्याची अकार्यकारी पदावर उचलबांगडी करण्यात आली आहे.