जळगाव (प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणुक लढविण्यास इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र भरण्यापासून वंचित राहू नये, त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपरिक पध्दतीने स्वीकारण्याचा तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळही ३० डिसेंबर, २०२० रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाढवून दिली आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने माहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावाधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यानुसार संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशन दाखल करण्यास २३ डिसेंबर, २०२० पासून सुरवात झाली. ३० डिसेंबर, २०२० अशी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. या कालावधीत संगणक प्रणालीत राज्यातून ३ लाख ३२ हजार ८४४ एवढे नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. मात्र, नामनिर्देशन पत्र दाखल करताना २८ डिसेंबर, २०२० रोजी सायंकाळपासून काही तांत्रिक अडचणी, तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने वरील निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.
















