पिंप्री खुर्द/पाळधी (प्रतिनिधी) -“प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) ही ग्रामीण युवक, महिला व शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. प्रत्येक गावात असे प्रक्रिया उद्योग उभे राहिले, तर स्थानिक रोजगार निर्माण होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल. या योजनेंतर्गत पिंप्री येथे स्वामी कुल्फी उद्योग केंद्रामुळे १५ ते २० स्थानिक नागरिकांना थेट रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लघुउद्योगांना चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
पिंप्री खुर्द येथे आज स्वामी कुल्फी या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग केंद्राचा भव्य व उत्साहपूर्ण शुभारंभ पालकमंत्री तथा स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला. पालकमंत्र्यांचे फटक्यांच्या आकाशवाणीत व ढोल ताशांच्या गजरात जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी स्वामी कुल्फी उद्योग केंद्राचे संचालक श्री. जयेश सुनिल बडगुजर यांनी मान्यवरांना उद्योगाच्या उत्पादन प्रक्रिया, कुल्फी, कँडी व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीबाबत सविस्तर माहिती दिली. अवघ्या २४ व्या वर्षी युवकाने उद्योग उभारल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष समाधान व्यक्त करत युवकांसाठी हा प्रेरणादायी आदर्श असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा संसाधन व्यक्ती (DRP) समाधान पाटील यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षक योगेश मोहकर यांनी तर आभार आयोजक जयेश बडगुजर यांनी मानले.
उपस्थित मान्यवर
या कार्यक्रमास जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री दोहरे, जिल्हा संसाधन व्यक्ती (DRP) समाधान पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल बापू चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सभापती पी. सी. आबा पाटील, पिंप्री खुर्द चे माजी सरपंच ज्ञानेश्वर बडगुजर, पोलीस पाटील गोपाल बडगुजर, सुनिल बडगुजर, भोद चे माजी सरपंच राजेंद्र पाटील, विद्यमान सरपंच तथा विजय मार्बलचे संचालक विजय पाटील, सेवा सुपर मार्टचे संचालक संदीप पाटील, सामाजिक कार्यकर्त्या कमलाबाई धोबी, जळगावचे रोशन पाटील यांच्यासह पिंप्री खुर्द व अंजनी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तरुण उद्योजक जयेश बडगुजर व आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.















