जळगाव (प्रतिनिधी) तैली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त यंदा जळगावात भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील बांधव आणि भगिनींमध्ये उत्साहाचे वातावरण असून कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
रॅलीसंदर्भात समाज बांधवांना दिलेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर सोमवार रोजी सकाळी ९:३० वाजता तरुण कुढापा चौक येथे सर्व सहभागी एकत्र येणार आहेत. यानंतर रॅलीचा प्रवास पांडे डेअरी चौक, स्वातंत्र्य चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चित्रा चौक, नेरी नाका, एसटी वर्कशॉप परिसर, का. उ. कोल्हे विद्यालय या मार्गे पुढे नेण्यात येईल. रॅलीचा समारोप संताजी जगनाडे महाराज उद्यान येथे होणार आहे.
या रॅलीद्वारे संताजी महाराजांनी सांगितलेल्या सामूहिक विकास, सामाजिक ऐक्य आणि सेवाभावाच्या संदेशाचे स्मरण करण्याचा उद्देश असल्याचे समाज प्रतिनिधींनी सांगितले. तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम भव्य आणि शिस्तबद्ध करण्याचे आवाहनही समाजाकडून करण्यात आले आहे.
समस्त जळगाव शहर तेली समाजाने समाजातील सर्व बांधव आणि भगिनींना संताजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित या रॅलीत सहभागी होण्याचे आव्हान अध्यक्ष प्रशांत सुरळकर बबन चौधरी रामचंद चौधरी यांनी केले आहे.
















