श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेडने हल्ले करण्यात आल्याची घटना घडली आहे. मंगळवारी श्रीनगरमधील गर्दीचे ठिकाण असलेल्या अमिरा कडल भागात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. विशेष म्हणजे या हल्ल्याच्या ठिकाणापासून काँग्रेस कार्यालय अवघे ५०० मीटर अंतरावर आहे. त्यातच काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी 2 तासापूर्वी या कार्यालयाचे उद्घाटन केले होते.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, “अमिरा कडल पुलाजवळ ग्रेनेडने सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्याचा रस्त्याच्या कडेला स्फोट झाला.” दरम्यान, या हल्ल्यात तारिक अहमद नावाचा एक नागरिक जखमी झाला आहे. ‘दुपारी २.४० च्या सुमारास दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या बंकरला लक्ष्य करत ग्रेनेड फेकला. या हल्ल्यात कोणतेही सुरक्षा कर्मचारी जखमी झाले नसल्याचे सीआरपीएफचे डीआयजी किशोर प्रसाद यांनी सांगितले आहे.
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवले आहे. या निर्णयाला ५ ऑगस्ट २०२१ रोजी दोन वर्ष झाले. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी हे जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आले आहेत. विशेष म्हणजे कलम ३७० हटवल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाचा दौरा आहे. त्यांनी मंगळवारी श्रीनगरमधील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला.