येवला (प्रतिनिधी) ठेकेदार मार्फत झालेल्या विकास कामाचे बील मंजूर करण्यासाठी तसेच चेकवर सही करून घेण्यासाठी मूल्यांकन बिलाच्या दोन टक्के प्रमाणे २० हजार रुपयाची लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मच्छिद्रनाथ धस तसेच प्रांत कार्यालयातील अव्वल कारकुन जनार्दन रहाटळ यांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे ग्रामपंचायत हद्दीतील वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत २०२२-२०२३ करिता प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या ग्रामपंचायततील वस्तीवर ठेकेदार मार्फत झालेले विकास कामाचे बील मंजूर करण्यासाठी चेकवर सही करून घेण्यासाठी मूल्यांकन बिलाच्या दोन टक्केप्रमाणे २० हजार रुपयाची लाचेची मागणी करून शुक्रवारी (दि.५) रोजी स्वीकारली. यावेळी एसीबीच्या पथकाने त्यांना पंचसमक्ष रंगेहाथ पकडले आहे. तपास अधिकारी निलिमा केशव डोळस पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गांगुर्डे, नाईक संदीप हांडगे, पोलिस शिपाई सुरेश चव्हाण आदीच्या पथकाने ही कारवाई केली.
दुसरी घटना येथील येवला उपविभागीय कार्यालयात घडली. कार्यालयाचे अव्वल कारकुन जनार्दन भानुदास रहाटळ यांनी भूसंपादनाचा ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात ११०० रुपयाची मागणी करून तडजोडी अंती ७०० रुपये लाचेची रक्कम शुक्रवारी (दि. ५) जुलै रोजी उपविभागीय अधिकारी स्वीकारली. त्यांच्याविरुद्ध येवला शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशीरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक मीरा आदमाने यांच्यासह सापळा पथकातील पोलीस हवालदार पंकज पळशीकर, नाईक प्रमोद चव्हाणके, नाईक परशराम जाधव आदीनी केली.