जळगाव (प्रतिनिधी) नोकरीचे आमिष दाखवून रॉयल गोल्ड फायनान्स कंपनीत (नटवर टॉकिजच्या समोर) फसवणूक करण्यात आल्याबाबत पहूरच्या दोन तरुणांनी जळगाव शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नौकरीच्या निमित्ताने विविध कागदपत्र घेवून त्यांच्या नावावर फर्म तयार करून कोट्यांवधीचा जीएसटी घोटाळा केल्याचे नुकतेच वस्तू व सेवाकर (जीएसटी) गुप्तचर महासंचालनालयाच्या केंद्रीय पथकाच्या नाशिक युनिटने धाड टाकल्यानंतर समोर आले होते.
या संदर्भात प्रवीण विठ्ठल कुमावत आणि अशोक सुखराम सुरवाडे (दोघं रा. पहूर. ता. जामनेर) यांनी शहर पोलिसात दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, आजच्या तीन वर्षाआधी आम्हांस मित्राकडुन माहिती पडले की, रॉयल गोल्ड फायनान्स जळगावमध्ये जॉब व्हॅकन्सी आहे. त्यानुसार मी प्रविण विठ्ठल कुमावत आणि अशोक सखाराम सुरवाडे हे दोघं रॉयल फायनान्स कंपनी जळगावमध्ये आलो व त्या ठिकाणी आल्यावर रॉयल फायनान्स कंपनीचे अकाऊंटंट पिंटु बंडु इटकरे यांना भेटलो. त्यांच्याशी जॉब संदर्भात बातचीत केली. त्यांनी आम्हाला कागदपत्रे घेवुन दुसऱ्या दिवशी बोलाविले आणि आम्हाला नोकरी देवु असे सांगितले. त्या अनुषंगाने आमचे आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स व कॅन्सल चेक दिले. त्यानंतर त्यांनी जळगाव अॅक्सीस बँकेमध्ये आमचे अकाऊंट ओपन केले. त्यानंतर १५ दिवसांनी आम्ही दिलेल्या पत्त्यावर चेकबुक व एटीएम पोष्टाने घरी आले. त्यानंतर आम्ही त्यांना फोन लावुन सांगितले. त्यांनी आम्हाला रॉयल फायनान्स कंपनीमध्ये चेक बुक आणि एटीएम घेवून बोलाविले व ब्लॅन्क चेक बुकवर स्वाक्षरी घेवुन एटीएम त्यांच्या ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी ८ ते १० महिने आठवडयातुन दोन ते तीन दिवस बोलावणे केले. त्या मोबदल्यात त्यांनी आम्हाला ८ ते १२ हजार पर्यंत पगार दिला आणि त्यांनी सांगितले की, आपली रॉयल फायनान्स कंपनी तोट्यात जात असुन तुम्ही दुसरे काम बघुन घ्या.
तीन वर्षानंतर दि.०३/०३/२०२१ रोजी जी.एस.टी. नाशिक पथकाने माझ्या मेडिकलवर छापा मारुन माझी चौकशी केली. त्यांनी मला सांगितले की, सदर तुझ्या नावावर कृष्णा स्टील ही कपंनी व अशोक सुरवाडे यांच्या नावावर ए.एस. स्टील अशा दोन कंपनी रजिष्टर असुन त्यांचा जी.एस.टी. भरणा कंम्प्लीट झाला नाही. तुमच्या पाचोरा रोड संतोषी माता नगरमध्ये या दोन्ही कंपन्या कागदोपत्री दाखविलेल्या आहे. यामध्ये जी. एस.टी फ्रॉड सुध्दा आहे. तेव्हा आम्हाला कळाले की, रॉयल गोल्ड फायनान्स कंपनी यांनी आमच्याकडुन नोकरीचे आमिष दाखवुन घेतलेल्या कागदपत्रांचा दुरूपयोग करुन आम्हाला फसविले आहे आणि आमच्या सारखे पहर मधील ३ ते ४ लोकांनी नोकरीसाठी कागदपत्रे दिलेले होते. त्यांच्या नावावर सुध्दा अशा फ्रॉड कंपन्या चालु करुन त्यांना देखील फसविले असल्याचे तक्रारी अर्जात म्हटले आहे.