जळगाव (प्रतिनिधी) थंडी व उन्हाळी तापमान निकष तसेच एप्रिल मे महिन्यात शेतीचे नुकसान झाले असून जिल्ह्यातील हवामान आधारित केळी फळपीक विमा योजनेत, भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी महसूल मंडळनिहाय जवळपास ३५० कोटी रुपये भरपाईपोटी पात्र देखील झाले आहे मात्र हे पैसे अद्यापही मिळालेले नसल्याने शेतकऱ्यांना ही रक्कम तात्काळ मिळावी याकरिता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत पैसे तात्काळ देण्याच्या सूचना दिल्या आहे.
यावेळी जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर व शेतकरी तक्रार निवारण समितीचे सीए. हितेश आगीवाल हे उपस्थित होते, त्यांनाही विमा कंपनी सोबत शासकीय यंत्रणा वापरून शेतकऱ्यांच्या शेताची योग्य पडताळणी करण्यास सूचना दिल्या, आणि तत्काळ थंडी व ऊन तापमान निकषात बसलेल्या शेतकऱ्यांना जवळपास ३५० कोटी रुपयांचे रक्कम त्वरित वितरित करावी असे आदेश दिले. तसेच, कृषी अधिकारी व विमा कंपनी सोबत पालकमंत्र्यांसमोर पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार आहे.
शेतकरी हित, हेच गुलाबभाऊंचे ब्रीद आहे. त्यानुसार एप्रिल व मे २०२३ कालावधी दरम्यान जिल्ह्यातील ६० महसूल मंडळात सलग ५ दिवस तापमान जास्त राहिल्याने केळी पिकाला जास्त तापमानाचा फटका बसून, बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते. जिल्ह्यातील पात्र तालुका व महसूल मंडळांना मे महिना जास्त तापमान सलग ५ दिवस ४५ डिग्रीसाठी ४३ हजार ५०० प्रती हेक्टर नुकसान भरपाईस पात्र आहे. एप्रिल महिन्यात जास्त तापमान सलग ५ दिवस ४२ डिग्री होते त्यासाठी ३५ हजार प्रती हेक्टर नुकसान भरपाई मिळणार आहे. या पूर्वी १ नोव्हेंबर २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान जिल्ह्यातील ५६ महसूल मंडळात सलग ३ दिवस कमी तापमानामुळे प्रति हेक्टर रक्कम २६ हजार ५०० रुपये मंजूर झाले होते.