जळगाव (प्रतिनिधी) पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरच्या दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमात आमचे राज्य सक्रीय सहभाग घेण्यासाठी सज्ज असल्याचे आश्वासन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. या उपक्रमाबाबत आज केंद्रीय जलशक्ती व स्वच्छता मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्यासोबत ना. पाटील यांनी व्हिसीच्या माध्यमातून संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरच्या दरम्यान देशात ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी केंद्रीय जलशक्ती व स्वच्छता मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी शुक्रवारी देशातील सर्व राज्यांच्या स्वच्छता मंत्र्यांशी संवाद साधला. यात महाराष्ट्राचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील जळगावातून अजिंठा शासकीय विश्रामगृहातून या संवादात सहभागी झाले. याप्रसंगी त्यांनी राज्य शासनातर्फे स्वच्छता खात्याच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामगिरीची माहिती दिली. पाटील म्हणाले की, ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांमध्ये आम्ही या अभियानाच्या अंतर्गत आम्ही व्यापक उपक्रम राबविणार आहोत. तर केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सदर अभियान यशस्वी करण्याचे याप्रसंगी आवाहन केले. या अभियानात लोकसहभाग हा जास्तीत जास्त कसा होईल ? याकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याची ग्वाही पाटील यांनी दिली.