मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसैनिकांच्या हातावर तुरी देत मुंबईतून गुवाहाटी गाठलीय. दरम्यान, नितीन देशमुख, कैलास पाटील या दोन शिवसेना आमदारांनी महाराष्ट्रात परत येण्यासाठी किती ‘त्रास’ झाला याचं वर्णनही केलं. हे सगळं ऐकायला जितकं थरारक वाटतं, तितकं गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारांचा प्रवासही थरारक आहे. एखाद्या सिनेमाला किंवा कादंबरीत शोभावं असे प्रकार करत हे आमदार मुंबईतून बाहेर पडले आहेत. गुलाबराव पाटील त्यातलेच एक.
गुलाबराव पाटलांनी ‘असा’ दिला गुंगारा
मंगळवारी (21 जून) रात्री उशीरा गुलाबराव पाटील गायब आहेत आणि नॅाट रिचेबल झालेत, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्यांना मिळाली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत पहिल्या दिवशी बंडखोरी करण्यामध्ये गुलाबराव पाटील नव्हते. त्यानंतर गुलाबरावांना यांना शोधण्यासाठी शिवसैनिकांना कामाला लावण्यात आलं.
दक्षिण मुंबईतील विभागप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी शोधमोहीम सुरू केली. शिवसेना आमदार सेंट रेजिसमध्ये होते. पण पाटील तिथे नव्हते. त्यांना रात्रभर शोधण्यात आलं. परंतु ते सापडले नाहीत. बुधवारी (22 जून) सकाळी पाटील सरकारी बंगल्यावर असल्याची माहिती मिळाली. शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ त्यांच्या बंगल्यावर पोहोचले. पाटील यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेत पाटील यांनी सेना नेत्यांना मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे असं सांगितलं.
पाटील यांना भेटलेले सेना नेते नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, “आम्ही पाटील यांना मुख्यमंत्र्यांकडे चला असं सांगितलं. पण ते म्हणाले मला मंत्रालयात काम आहे. सिडकोत काम आहे.” त्यानंतर पाटील मंत्रालयात गेले. तिथे त्यांनी आपली सरकारी गाडी सोडून खासगी गाडीने मंत्रालय सोडलं. कार्यकर्ते पाटील यांची वाट पहात होते. पण पाटील कुठेच सापडले नाहीत.
सेना नेते सांगतात, “गुलाबराव पाटील मंत्री आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे यावं अशी आमची इच्छा होती. पण त्यांनी आम्हाला मंत्रालयात काम असल्याचं खोटं सांगितलं. त्यानंतर ते नॅाट रिचेबल झाले. मग काहीच संपर्क होऊ शकला नाही.” पाटील वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांच्यावर आम्हाला जबरदस्ती करायची नव्हती. आम्ही विनंती करायला गेलो होतो. पण त्यांची इच्छा असेल तर आम्ही काय करणार. त्यानंतर पाटील बुधवारी रात्री उशीरा गुवाहाटीला पोहोचले. बीबीसी मराठीने याबाबतचे वृत्त दिले आहे.