धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील चोपडा रोडवर आज गुटख्याची गाडी पकडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांनी ही कारवाई केली आहे.
या संदर्भात अधिक असे की, चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले हे आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास धरणगाव येथे नियोजित कार्यक्रमासाठी येत होते. याचवेळी क्रीडा संकुलजवळ एक संशयित वाहन त्यांना आढळून आले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात विमल गुटखा, सिगारेट, सुगंधी सुपारी यासह विविध पदार्थ आढळून आलेत. यावेळी पोलिसांनी संतोष राजेंद्र चौधरी (रा. धरणी चौक, धरणगाव) या संशयितास ताब्यास घेतले. संशयितास ताब्यात घेतल्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांनी त्याच्या घराची देखील झाडाझडती घेतली. त्यात आणखी दोन-तीन पोते भरून माल आढळून आला. याप्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, या कारवाईमुळे धरणगाव परिसरातील गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.