यावल (प्रतिनिधी) किराणा दुकानात बंदी असलेला विमल गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकत एक लाख 44 हजार 686 रुपयांचा बंदी असलेला गुटखा जप्त केला दुकान मालकाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
किनगाव बुद्रुक गावातील मुख्य चौकाजवळ अनिल किराणा दुकानाचे मालक जगन्नाथ विठ्ठल पाटील यांनी आपल्या दुकानात बंदी असलेला गुटखा विक्रीसाठी ठेवला होता. याची माहिती यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळाली. त्यांनी त्या ठिकाणी पथक पाठवज तपासणी केली असता. दुकानांमध्ये बंदी असलेला विमल गुटखासह इतर प्रतिबंधित गुटखा त्यांना मिळून आला. एकूण एक लाख 44 हजार 686 रुपयांचा मुद्देमाल त्यांनी तिथून जप्त केला. याप्रकरणी यावल पोलिसात हवालदार नरेंद्र बागुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुटखा अवैधरित्या बाळगणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला व दुकान मालक यांना अटक करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.