नागपूर (वृत्तसंस्था) जात आडवी आल्याने अर्ध्यावर थांबलेली प्रेमकहाणी लग्नाच्या १४ वर्षांनंतर पुन्हा नव्याने सुरुवात केली. साऱ्या मर्यादाही ओलांडल्या. दरम्यान, महिलेला त्यांच्या संबंधाचे व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करू लागला. कोंडी झाल्याने तिने नवऱ्याला हा प्रकार सांगितला. याप्रकरणी प्रियकराच्या विरोधात पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
मनीष सजन तांबेकर (वय ३८) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. तो पानटपरी चालवतो. तक्रार करणारी महिला (वय ३५) आणि मनीषमध्ये १४ वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते. जात आडवी आल्याने त्यांच्या घरच्यांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला. त्यानंतर आधी तिचे आणि नंतर मनीषचे लग्न झाले. दोघांनाही तीन-तीन अपत्ये आहेत. दीड वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या कालावधीत ते पुन्हा संपर्कात आले. त्यानंतर जुने प्रेम नव्याने उफाळून आले.
दोघांची प्रेमकथा बहरू लागली. नियमित शरीरसंबंधही प्रस्थापित झाले. मे २०२० पासून तो तिच्यावर नको तेवढा अधिकार दाखवू लागला. महिलेच्या पतीला त्यांच्या प्रेमकथेची माहिती झाली. त्यानंतर तिने मनीषला टाळणे सुरू केले. मनीष तिला त्यांच्या संबंधाचे व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करू लागला. कोंडी झाल्याने तिने नवऱ्याला हा प्रकार सांगितला. त्यानंतर प्रकरण जरीपटका ठाण्यात पोहचले. पोलिसांना महिलेने आपली व्यथा सांगितली. पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. जरीपटका पोलिसांनी बुधवारी रात्री आरोपी प्रियकराला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून त्याचा मोबाइलही जप्त केला असून, त्यात त्याने महिलेसोबतच्या एकांतक्षणाचे व्हिडीओ दडवून ठेवल्याचे उघड झाले आहे.