मुंबई (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यावर भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी टीका करत रोजगार पळवून नेण्यासाठी गुप्त बैठका घेतल्या जात असल्याचा आरोप केला. याला आता शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. Vibrant Gujarat साठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत अर्धे मंत्रिमंडळ घेऊन आले आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटले, vibrant Gujarat ची प्रसिद्ध झालेली जाहिरात ट्विट केली आहे. ममता बॅनर्जी मुंबईत उद्योगपतीना भेटायला आल्या तर पोटशूळ उठला म्हणे मुंबईतील उद्योग पळवायला आल्यात. आज vibrant Gujarat साठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत अर्धे मंत्रिमंडळ घेऊन आले आहेत? मुंबईत त्यांचा रोड शो होतोय. आत्मनिर्भर गुजरात मुंबईला ओरबाडून, असे संजय राऊत यांनी म्हटले.
भाजपचे मुंबई प्रेम हे बेगडी असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. मुंबईतून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरात पळवून नेले तेव्हा भाजपचे बोलभिडू शेपूट घालून का बसले, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. योगी आदित्यानाथ मुंबईतील सिने उद्योग उत्तर प्रदेशात खेचण्यासाठी शर्थ करत असल्याची आठवणही राऊत यांनी भाजप नेत्यांना करून दिली.
काय म्हणाले होते आशिष शेलार?
ममता बॅनर्जी यांच्या पोटात एक आणि ओठात एक आहे. रोजगार निर्मिती व्हावी अशी आमची इच्छा आहे. पण राज्यातील उद्योग बाहेर घेऊन जात आहेत का? राज्यातील तरूणांना वडापाव विकायला लावणार आणि उद्योग पश्चिम बंगालमध्ये घेऊन जाणार आहात का? बंगला देशी लोकांशी तुमचं नातं काय आहे ? गुप्त बैठका का घेत आहेत? वाघीण म्हणून पाठराखण करत असाल तर त्रिपुरा येथे झालेल्या पराभवाबद्दल रुदालीचा कार्यक्रम ठेवा, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला होता.