ब्राझील (वृत्तसंस्था) ब्राझीलला (Brazil) मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. रियो दि जनेरियो (Rio de Janeiro state) राज्यातील डोंगराळ भागात अतिवृष्टीनंतर पूर आणि भूस्खलनामुळे जवळपास ९४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २१ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर अजुनही ३५ जण बेपत्ता आहेत.
ब्राझीलमध्ये मंगळवारी मुसळदार पाऊस झाला, त्यामुळे अनेक भागात भूस्खलनाची स्थिती निर्माण झाली. ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी आपल्या मंत्र्यांना नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्याचे सांगितले आहे. रियो दी जेनेरियो या शहराच्या डोंगराळ भागात मुसळधार पावसाने आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ९४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी उशिरा रात्री वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे अनेकांच्या घराची पडझड देखील झाली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, अनेक जण अजुनही बेपत्ता आहेत. सुमारे १८० पेक्षा जास्त सैनिकांना घटनाग्रस्त ठिकाणी तैनात असून, बचावकार्य सुरू आहे. रियो दी जेनेरियोच्या उत्तर भागातील पेट्रोपोलिस या शहरात अवघ्या तीन तासात २५.८ सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर ब्राझीलच्या भूस्खलनाचे व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. ब्राझीलमध्ये पावसाने अचानक हाहाकार घातल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.