बीड (वृत्तसंस्था) नातेवाईकाच्या मुलीसाठी मुलगा पाहायला जात असतांना झालेल्या भीषण अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार (दि. १) रोजी मांजरसुंबा केज रस्त्यावरील सारणी (सांगवी) फाट्याजवळ घडली. भागवत महादेव तांदळे (वय ४५, रा. आंबील वडगाव, ता. केज) असे मृताचे नाव आहे.
तालुक्यातील खाडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहशिक्षक असलेले भागवत महादेव तांदळे व त्यांची पत्नी महानंदा भागवत तांदळे (वय ३८, रा. आंबील वडगाव ता. केज) नातेवाइकांच्या मुलीला स्थळ पाहण्यासाठी गुरूवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास दुचाकीने (एमएच – २३ / एझेड- ०८३७) केज-मांजरसुंबा रस्त्याने जात होते.
सारणी (सांगवी) पाटीजवळ भरधाव वेगाने निघालेल्या टिप्परने (एमएच- ०४/जीसी-८०३ -८०३६) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात भागवत तांदळे डोक्यावरून टिप्परचे पाठीमागील चाक गेल्यामुळे ते जागीच ठार झाले. तर पत्नी महानंदा तांदळे या गंभीर जखमी झाल्या. जखमी महिलेला अंबाजोगाई येथील शासकीय ग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रामकिसन तांदळे यांच्या फिर्यादीवरून टिप्पर चालकाविरोधात केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.