चंद्रपूर (वृत्तसंस्था) जिल्हात सध्या मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनेत वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाली. पुरुषोत्तम बसपचे (४५, रा. इंदिरानगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
इंदापुरातील एका पोलाद कारखान्यात पुरुषोत्तम बसपचे हे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास कारखान्यासमोर असलेल्या हनुमान मंदिरात पूजेला फूल तोडण्यासाठी लोहारा जंगल परिसरात गेले असता त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करत ठार केले. दुपार झाल्यावरही पुरुषोत्तम घरी परत न आल्याने घरच्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र कुठेही आढळून आले नाही. अखेर मंदिर परिसराला लागून असलेल्या जंगलात बसपचे यांचा शोध घेतला असता तिथे त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत वन विभागला माहिती देण्यात आली. वन विभागाच्या चमूने पंचनामा करत मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला.