वरणगाव, ता. भुसावळ (प्रतिनिधी) वरणगावात जाणाऱ्या जुन्या महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या दुचाकींची समोरासमोर जबर धडकून झालेल्या अपघातात वरणगाव व फुलगावातील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय रामकृष्ण महाजन (वय ४७) आणि ललित धांडे (वय ३५), अशी मयतांची नावे आहेत.
दुचाकींची समोरा-समोरा धडक !
वरणगाव येथील महामार्गावरील शिवाजी नगर येथे बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकल स्वारांनी एकमेकांना धडक दिली. यात दोन्ही जण गंभीर जखमी झाले. या जखमींना वरणगावच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या भीषण अपघातात फुलगाव येथील माजी सैनिक कॉलनीतील विजय रामकृष्ण महाजन आणि वरणगाव येथील गणपती नगरमधील आदर्श शाळेजवळ राहणारे ललित धांडे या दोघांना आपले प्राण गमवावे लागले.
अपघात कसा झाला !
ललित धांडे हे फुलगावकडून वरणगावकडे येत असताना दुचाकी (एमएच – १९, ऐएच- ९१५४ ) ने समोरून येणाऱ्या दुचाकीवरील चालक विजय महाजन यांच्या दुचाकीवर समोरासमोर आदळल्याने दोघांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर इजा झाली. दोन्ही दुचाकी भरधाव वेगात असल्याने दोघांचा मृत्यू झाला असून दोन्ही दुचाकींची चेंदामेंदा झाला आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत उमेदवारी !
मयत विजय महाजन यांच्या पश्चात पत्नी, २ मुली, आई, भाऊ असा परिवार आहे. महाजन यांनी फुलगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत उभे होते. विजय महाजन यांनी वॉर्ड क्र. १ मध्ये सर्वसाधारण जागेवर उमेदवारी दाखल केली होती. मात्र, त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने ही निवडणूक रद्द झाली आहे. याबाबत भुसावळ तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगाकडे माहिती कळवली आहे. तर ललित धांडे यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, बहिण असा परिवार आहे. ललित धांडे हे मुंबई येथे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरीला होते. या प्रकरणी भूषण महाजन यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी, पोहेकॉ मनोहर पाटील करत आहेत.