उज्जैन (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यातल्या नागदामध्ये राज्य महामार्गावर एका व्यक्तीला ट्रकनं चिरडलं. याच महामार्गावर तीन वर्षापूर्वी व्यक्तीचा अपघात झाला होता. मात्र त्यावेळी त्याचा जीव वाचला. मात्र तीन वर्षानंतर त्याच दिवशी त्याच ठिकाणी त्याला मृत्यूनं गाठलं.
केशव त्याचा मित्र राहुलसह दुचाकीवरून जात होता. मंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीला अपघात झाला. एका ट्रकनं दुचाकीला धडक दिली. केशवचा जागीच मृत्यू झाला. तर राहुलवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. ट्रक एका ढाब्यावर उभा करून चालक फरार झाला आहे. केशवचा मृतदेह शवविच्छेदनानंतर त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. संपूर्ण घटना २२ एप्रिलला रात्री ११ वाजून १३ मिनिटांनी घडली. नागदा-जावरा राज्य महामार्गावर ट्रकनं दुचाकीला धडक दिली. केशव आणि राहुल दुचाकीवरून फिरायला निघाले होते. त्यावेळी ही घटना घडली.
अपघात झाल्यानंतर दोन दिवसांनी घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. अवघ्या ५ सेकंदांत केशवचा मृत्यू झाल्याचं त्यात दिसत आहे. केशव एका दुकानात सेल्समन म्हणून काम करायचा. २२ एप्रिलला तो दुकानातून लवकर निघाला. तीन वर्षापूर्वी याच दिवशी म्हणजेच २२ एप्रिलला केशवचा अपघात झाला होता. त्यातून त्याचा जीव वाचला. मात्र तीन वर्षांनी त्याला मृत्यूनं गाठलं.