परभणी (वृत्तसंस्था) सेलू तालुक्यातील रवळगाव (जि. परभणी) येथील पंख्याचा शॉक लागल्यान दीक्षा राहुल मकासरे (वय २६, रा. रवळगाव) ही महिला तिची दीड वर्षाची मुलगी इंदू राहुल मकासरे (वय दीड वर्षे, रा. रवळगाव) हिला आंघोळ घालून झाल्यानंतर तिला कडेवर घेऊन घरात परत येत असताना दोघींनाही पंख्याचा शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.१०) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान मायलेकींना महवितरण कंपनीचा हलगर्जीपणामुळे शॉक लागून नाहक जीव गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दीक्षा राहुल मकासरे ही महिला बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दीड वर्षाचा चिमुकली इंदू हिला आंघोळ घालून कडेवर घेवून घरात प्रवेश करत होती. त्यावेळी ती रस्त्यात असलेला पंखा उचलून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी त्या दोघींना वीजेचा जबर शॉक बसला. शॉक लागल्याने दीक्षा तसेच इंदू या मायलेकींचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे गावावर शोकळा पसरली आहे. दरम्यान महवितरण कंपनीच्या गावठाण रोहित्रावरून गावाला विद्युत पुरवठा केला जातो. पण त्याठिकाणी असलेल्या विद्युत रोहित्रास अर्थिंग असुन नसल्यासारखी असल्याने गावातील अनेक विद्युत ग्राहकांना विजेचा शॉक लागल्याचा घटना याआधी घडल्या आहेत. याबाबत ग्रामस्थांनी महवितरण कंपनीला वेळोवेळी माहिती दिली होती. पण त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच दोघींना नाहक जीव गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महवितरण कंपनीचे कामे ठेकेदाराचा माध्यामतून थातूरमातूर होत असल्यामुळेच ग्रामस्थांचा बळी जात आहेत. याप्रकरणी महवितरण कंपनीवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करणयात यावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. या प्रकरणी सेलू पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोद करण्यात आली आहे.