यवतमाळ (वृत्तसंस्था) अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून तीन रुपये, पाच रुपये, दहा रुपये अशी नुकसान भरपाई मिळाली. यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांसह शिवसेना (उबाठा) च्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी विमा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासले.
अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीमुळे प्रचंड नुकसान !
यवतमाळ तालुक्यातील यावली कारेगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतात घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीमुळे कापूस, सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले. याबाबतचे सर्वेक्षण, पंचनामे करून महसूल विभागाने अहवालही सादर केला. त्याची मदत शासनाकडून अद्याप मिळाली नाही. दुसरीकडे पिकांचा विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची आस होती. अलिकडेच ५९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४१ कोटी जमा केल्याची माहिती प्रशासनाकडून जारी करण्यात आली. दरम्यान, दिवाळीपूर्वी विमा कंपनीने ५९ हजार शेतकऱ्यांना ४१ कोटींची मदत जाहीर केली. या मदत यादीतील नऊ हजार ७२७ शेतकऱ्यांना एक हजार रुपयेसुद्धा मदत मिळाली नाहीत. अनेक शेतकऱ्यांना दोन, पाच, दहा रुपये, अशी नुकसानभरपाई मिळाली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात २००, ५००, एक हजार रुपयांची मदत जमा झाल्याचा प्रकार जाहीर केलेल्या यादीतून समोर आला आहे.
बहूतांश शेतकऱ्यांना तीन, पाच, दहा रुपये भरपाई !
दरम्यान, प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीत बहूतांश शेतकऱ्यांना तीन रुपये, पाच रुपये, दहा रुपये आणि एक हजाराच्या आतच रक्कम मिळाल्याचे समोर आल्यानंतर शेतकऱ्यांसह शिवसेना उबाठा आक्रमक झाली. मंगळवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह विमा कंपनीचे रावेंद्र कुशवाह यावली कारेगाव येथील मेरसिंग रमन राठोड शेतकऱ्याच्या शेतात आले. यावेळी अन्य शेतकरी व शिवसेना उबाठाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. केवळ तीन रुपयाची मदत मिळाल्याने विमा अधिकाऱ्यास जाब विचारत शिवीगाळ सुरू केली. शेतकऱ्यांकडून ५००-५०० रुपये घेतले असा आरोप करीत पंचनामे कुठे आहे, मदत कोणत्या आधारावर अशी प्रश्नांची सरबत्ती करून धारेवर धरत मारहाण सुरू केली. तसेच तोंडाला काळे फासून रोष व्यक्त केला. यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढत मध्यस्तीचा प्रयत्न केला.
पंचनामे सदोष तर मदत कशी?
शिवसेना उबाठाच्या वतीने तहसीलसमोर काळी दिवाळी साजरी करण्यात आली होती. त्यानंतर लगेच ‘शेतकऱ्यांची दिवाळी गोड’ असा गवगवा करण्यात आला. मात्र याची सखोल चौकशी केल्यानंतर विमा कंपनीचा गोंधळ दिसून आला. ५८ हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. मात्र पंचनामे केवळ सात हजार ९२० एवढेच उपलब्ध होते. कृषी सहाय्यक, शेतकरी यांच्या स्वाक्षऱ्याच पंचनाम्यावर नसून, क्षेत्रही चुकीचे नोंदविले गेले. याबाबत कृषी विभागाने विमा कंपनीला पत्र दिले. परंतु याची दखल न घेता मनमानी पद्धतीने विमा कंपनीने शेतकऱ्यांना दोन, तीन, पाच रुपयांची भरपाई दिली, अशी माहिती किशोर इंगळे, संजय रंगे यांनी दिली. दरम्यान, केवळ शेतकऱ्यांची थट्टा आणि शोषण सुरू आहे. १५ दिवसांत शासनाने तीन हजार १७२ कोटी शेतकऱ्यांना न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उपजिल्हा प्रमुख किशोर इंगळे, तालुकाप्रमुख संजय रंगे, माजी सभापती गजानन पाटील, युवा सेनेचे अक्षय ठाकरे यांनी दिला आहे.