औरंगाबाद (वृत्तसंस्था) मराठवाड्यातील काही भागात शुक्रवारी रात्री पुन्हा मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर दुसऱ्यादिवशी म्हणजे शनिवारी दुपारी विविध भागात वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला तर एक विद्यार्थी आणि एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
लातूर जिल्ह्यातील गव्हाण (ता. रेणापूर) शिवारात शनिवारी दुपारी चार वाजता विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी शेतमजूर सोयाबीन काढणीचे काम करीत होते. वीज पडून उज्ज्वला नागनाथ खपराळे (वय ३५, रा. शिळवली, ता. देगलूर, जि. नांदेड) यांचा जागीच मृत्यू झाला तर लक्ष्मीबाई धनाजी देवकते (वय ५५ रा. लिंगी ता. औराद, जि. बिदर कर्नाटक) या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर लातूर येथे उपचार सुरू आहेत.
दुसऱ्या घटनेत बीड जिल्ह्यातील मिसळवाडी (ता. पाटोदा) येथील शिवराज गोविंद चव्हाण (वय १७ ) याचा वीज पडून मृत्यू झाला. अकरावीत असलेला शिवराज शनिवारी दुपारी गुरांना वाघदरा परिसरातील माळरानावर घेऊन गेला होता. तिसऱ्या व चौथ्या घटनेत नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील रिसनगाव व अष्टुर येथे दुपारी चार वाजता वीज पडून प्रत्येकी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. बालाजी बापूराव पवार (वय ४०, रा. रिसनगाव) आणि महिपती दत्ता म्हेत्रे (वय १९, रा. अष्टुर) अशी मृतांचे नावे आहेत. पाचव्या घटनेत नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील कोसमेट येथे दुपारी दोनच्या सुमारास वीज पडली. यात इयत्ता पाचवीत असलेल्या सुशांत गजानन कामीलवाड (वय ११) याचा मृत्यू झाला झाला तर तनमन देविदास वाघमारे (वय ११) हा गंभीर जखमी झाला. दोघे बकऱ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. पाऊस सुरू असल्याने ते एका झाडाखाली थांबले होते.
















