परभणी (वृत्तसंस्था) हॉटेलमध्ये नाष्ट्यासाठी आलेल्या ग्राहकाने लवकर नाष्टा देण्याची मागणी करताच वाद होऊन हॉटेल चालक मालक, त्याच्या मुलगा व दोन कामगारांनी मिळून ग्राहकाला लाकडाने मारहाण केली. या मारहाणीत ग्राहकाच्या डोक्यात लाकडाचा जोरदार फटका बसल्याने तरुण ग्राहकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.३) सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. शेख अजगर शेख खाजा (वय ३३, रा. केळी ता. औंढा नागनाथ जि. हिंगोली) असे खून झालेल्या ग्राहकाचे नाव आहे.
हॉटेल मालकासह चौघांची मिळून मारहाण !
औंढा नागनाथ तालुक्यातील केळी येथील रहिवासी शेख अजगर शेख खाजा (वय ३३) हा मुंबईमध्ये एमएसएफमध्ये नोकरीला होता. गुरुवारी (दि.२) सायंकाळी ५ वाजता मुंबई येथे डयूटी ज्यॉईन करण्यासाठी घरून दुचाकीने जितूरकडे निघाला. सायंकाळच्या सुमारास जितूरला पोहचला. रात्री त्याने शहरात कुठेतरी मुक्काम केला. यानंतर शुक्रवारी (दि.३) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तो शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सपना हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेला. या ठिकाणी त्याचे हॉटेल मालक चालक शेषराव लक्ष्मण आव्हाड त्यांचा मुलगा अमोल शेषराव आव्हाड, कामगार बालाजी पांडुरंग रणखांबे, इम्रान बन्या कुरेशी यांच्यासोबत नाष्टा देण्यावरून वाद झाला. त्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यावेळी हॉटेल मालकासह चौघांनी मिळून त्याला लाकडाने मारहाण केली. या मारहाणीत ग्राहकाच्या डोक्यात लाकडाचा जोरदार फटका बसल्याने तो जागीच कोसळला. घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.
शवविच्छेदन रोखले !
मयत शेख अजगर यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी व त्यांच्याविरूध्द खुनाचा गुन्हा नोंद करावा. त्यानंतर शवविच्छेदन करावे, अशी मागणी नातेवाईकांनी केली असता स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी त्वरित फिर्याद नोंदवून घेत बार आरोपीविरूध्द जितूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. हॉटेल मालक व इतरांच्या मारहाणीत ग्राहकाचा मृत्यू झाल्याची घटनेची माहिती संपूर्ण शहरात पसरताच ग्रामीण रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी केली. यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी सायंकाळपर्यंत तळ ठोकून होते.
गुन्ह्यातील आरोपी ताब्यात !
या प्रकरणी मयताचा लहान भाऊ शेख अफसर शेख खाजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेल चालक मालक शेषराव लक्ष्मण आव्हाड, अमोल शेषराव आव्हाड, कामगार बालाजी पांडुरंग रणखांबे, इम्रान बन्या कुरेशी या चौघांवर जितूर पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकर नाष्टा मागण्याच्या कारणावरून जीवे मारण्याची घटनेची माहिती मिळताच जितूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी घटनास्थळ गाठून चारही आरोपीना ताब्यात घेतले.