उत्तराखंड (वृत्तसंस्था) केदारनाथमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्वच्या सर्व सहाजणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी बचाव पथक पाठवलं आहे. हेलिकॉप्टरने केदारनाथ बेस कॅम्प येथून नारायण कोटी-गुप्तकाशीसाठी उड्डाण केलं आणि केदारनाथपासून तीन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला.
गुप्तकाशीहून जेव्हा हे हेलिकॉप्टर केदार घाटीकडे निघाले तेव्हा ते गरुडचट्टी येथे कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये ६ जण होते असे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हे हेलिकॉप्टर खासगी कंपनीचं असल्याचं सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टर संदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 21-22 ऑक्टोबर रोजी केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देणार असताना ही घटना घडली आहे.
2019 मध्येही केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले होतं. प्रवाशांना केदारनाथहून फाटा इथे घेऊन जात असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाला इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं आणि यादरम्यान हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. लँडिंग करताना हेलिकॉप्टरचा मागील भाग जमिनीवर आदळल्याने हा अपघात झाला होता. सुदैवाने हेलिकॉप्टरच्या वैमानिकासह सहा प्रवाशांना कोणतीही इजा झालेली नव्हती.