मुंबई (वृत्तसंस्था) भोसरी जमीन प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. आजची सुनावणी काही कारणानं होऊ न शकल्यानं पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम आहे. तसेच एकनाथराव खडसे यांच्या याचिकेवरील पुढील सुनावणी ८ मार्चला होणार आहे.
पुण्यातील भोसरीमधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीने बजावलेल्या समन्सप्रमाणे खडसे ईडीसमोर हजर झाल्यानंतर त्यांची अनेक तास चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले. मात्र, त्यानंतर त्यांनी या कारवाईला आव्हान देणारी याचिका केली. खडसेंच्या याचिकेवर आज सुनावणी होती. मात्र, ही सुनावणी आज पूर्ण होऊ न शकल्यानं पुढील सुनावणी ८ मार्चला होणार आहे. आज काही कारणांमुळं एकनाथ खडसे यांच्या याचिकेवर सुनावणी होऊ न शकल्यानं न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने सुनावणी ८ मार्चला ठेवली आहे. त्यामुळं पुढील सुनावणीपर्यंत अटकेसारखी कठोर कारवाई न करण्याची हमी ईडीने कायम ठेवली आहे.
भाजपला रामराम ठोकून एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावली होती. त्यानंतर ३० डिसेंबरला एकनाथ खडसे यांना चौकशीला हजर राहायचे होते. ते ईडी कार्यालयात हजर होण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. परंतु, कोरोनाची लागण झाल्यानंतर अखेरीस १५ जानेवारीला ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते.