कर्नाटक (वृत्तसंस्था) कर्नाटकातील एका कॉलेजचा (Karnataka College) व्हिडिओ समोर आला आहे. जिथे मुस्कान नावाची मुलगी हिजाब घालून कॉलेजमध्ये येते. त्याचवेळी काही जणांचा जमाव हा मुलीच्या दिशेने पुढे सरकतो. खांद्यावर भगवी शाल घेतलेले ही लोकं मुलीसमोर ‘जय श्री राम’चा नारा देतात. पण या गर्दीला अजिबात न घाबरता मुलगीही तेवढ्याच जोरदारपणे ‘अल्लाहू अकबर’ असा नारा देते. आता याच मुलीचा Video सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
निदर्शकांचा प्रतिकार करणारी ‘ती’ कोण?
मंड्या येथील पीईएस महाविद्यालयातील या विद्यार्थिनीनं हिजाब परिधान केल्यानं निदर्शकांनी घोषणा देत तिला घेरलं. ती युवती आहे बीबी मुस्कान खान. निदर्शकांना तिनं घोषणा देत प्रत्युत्तरही दिलं. निदर्शनं करणाऱ्यांनी घेरल्यानंतर त्यांना प्रतिकार करणाऱ्या बीबी मुस्कान खान या विद्यार्थिनीचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समाजमाध्यमांवर तिचं कौतुकही झालं. दरम्यान, आता कर्नाटकात हिजाबविरोधात निदर्शनं करणाऱ्यांनी घेरल्यानंतर त्यांना प्रतिकार करणाऱ्या बीबी मुस्कान खान या विद्यार्थिनीचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर जमीयत उलेमा-ए-हिंद या संघटनेचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी तिला पाच लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केलीय. सोलापूर जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना इब्राहिम यांनी ही माहिती दिलीय.
हिजाबचा मुद्दा जानेवारीपासून चर्चेत
हिजाबचा हा मुद्दा कर्नाटकात जानेवारीमध्ये सुरू झाला होता. जानेवारीमध्ये उडुपी येथील सरकारी पीयू कॉलेजमध्ये ६ मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात बसण्यापासून रोखण्यात आले होते. महाविद्यालयाने गणवेश धोरणाचे कारण सांगितले, त्यानंतर विद्यार्थिनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि असा युक्तिवाद केला की त्यांना हिजाब घालण्याची परवानगी न देणे हे घटनेच्या कलम १४ आणि २५ अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.
कर्नाटकात शाळा, महाविद्यालये बंद
कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालये १२ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात महाविद्यालये आणि शाळांबाहेर हिजाब समर्थक आणि हिजाब विरोधक गटांकडून निदर्शने करण्यात येत आहे. हिजाब समर्थक ग्रुप हिजाब घातल्याने मुस्लिम विद्यार्थिनींना वर्गात प्रवेश नाकारल्याबद्दल आणि त्यांच्यावर लावण्यात आलेल्या बंधनांचा विरोध करत आहे. तर दुसरीकडे अनेक हिंदुत्ववादी संघटानांनी हिजाबचा विरोध करत हिंदू विद्यार्थ्यांना देखील भगव्या रंगाची शाल आणि टोपी वाटत आहे.