हिंगोली (वृत्तसंस्था) कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावर माळेगाव फाट्याजवळ चालकाच्या डुलकीमुळे झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर दीडशे मेंढ्या दगावल्या आहेत. दि.२५ (गुरुवार) रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास उभ्या असलेल्या ट्रकवर दुसरा ट्रक आदळल्यामुळे हा गंभीर अपघात झाला. मृतांमधील तिघे मध्य प्रदेशातील, तर एक जण राजस्थानचा रहिवाशी आहे.
राजस्थान येथील एका ट्रक (एचआर ५५ एजे ३१११ ) साधारण २०० मेंढ्या भरून हैदराबादकडे निघाला होता. ट्रकमध्ये ट्रकचालकासह चौघे केबिनमध्ये बसले होते, तर एक जण पाठीमागे मेंढ्यांसोबत बसला होता. हा ट्रक माळेगाव फाट्याजवळ आला असताना उड्डाणपुलाखाली ट्रकचालकाला डुलकी लागली आणि त्याने माळेगाव येथे उभा असलेल्या ट्रक (क्र. एमएच १८ बीए ९७१६) पाठीमागून जोराची धडक दिली.
या अपघातात हेमराज मीना (वय ३५, रा. एदपुर-राजस्थान), सत्यनारायण प्रल्हाद चोपदार (वय ४५, रा. पिपळदा-राजस्थान), आलीम अली नासेर खान (वय १८, रा. शिवपूर मध्य प्रदेश) या तिघांना तपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. आलम गुलशेरखाँ (वय ५३) व इद्रिस खान मेवाती (वय ४८) यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. नांदेड येथे उपचार सुरू असताना जखमींतील आलम गुलशेरखाँ (वय ५३) याचा मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातात दीडशे मेंढ्याही दगावल्या आहेत.