साप्ताहिक राशिभविष्य – ३ ते १० जुलै २०२२
मेष : राशीतील मंगळाची एक आचारसंहिता राहील. मूर्खांशी संवाद नकोतच. बाकी अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहाची सुरुवात अतिशय संगतीची.झटपट कामं. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. ३ ते ५ हे दिवस झकासच. प्रेमिकांना जबरदस्त इम्युनिटी मिळेल. कलाकारांचे, खेळाडूंचे मोठे भाग्योदय.
वृषभ : शुभ ग्रहांची मंत्रालयं आपणावर खूष राहतील, घ्या हात धुऊन. गुंतवणूक करा. नव्या ओळखींचा लाभ उठवा. ता. ४ ते ६ हे दिवस रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना चढत्या क्रमाने मजेदार. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींचे वास्तुविषयक व्यवहार. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी पाकीट जपा
मिथुन : राशीचे रवी-बुध मोठी मजेदार भूमिका निभावतील, फक्त शिस्तबद्ध राहा. व्यावसायिक गाठीभेटी कराच. ता. ६ ते ८ हे दिवस मोठ्या आर्थिक उत्कर्षाची ग्वाही देतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती चतुराईतून मोठे लाभ उठवतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींच्या सुंदर मुलाखती. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात प्रसिद्धियोग.
कर्क : गुरुवारच्या अष्टमीच्या प्रभावक्षेत्रात गुरुबळ उत्तम राहील. घरातील तरुणांचे प्रश्न सुटतील. काहींना संकटाच्या काळात गॉडफादर भेटतील. मात्र, सप्ताहात नोकरीतील वाद टाळा. शनिवार जपा. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ६ ते ८ हे दिवस प्रचंड प्रवाही. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग.
सिंह : सप्ताहात शुक्रभ्रमणाचं सुगंधित स्पंदन राहीलच. ता. ६ ते ८ हे दिवस मोठ्या सुंदर घडामोडींचे, तरुणांना मोठं घवघवीत यश देणारे. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवारची अष्टमी मोठ्या भाग्योदयाची. व्यावसायिक शुभारंभ. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना गुडघ्यांचा त्रास.
कन्या : गुरुवारच्या अष्टमीचं प्रभावक्षेत्र जबरदस्त राहील. नवीन उपक्रम राबवा. तरुणांनो हीच ती वेळ, प्रेम करा किंवा प्रेमात पडा. सप्ताहात बुध-शुक्राच्या ओव्हर्स मोठ्या मजेदार राहतील. मात्र, वाहनावर जपा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सहचरी मिळेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मानाचा किताब मिळेल
तूळ : सप्ताहात मंगळाच्या लष्करी राजवटीचा अंमल वाढेल. पोरी जरा जपून. महिलावर्गाने सांभाळलंच पाहिजे. भावनांचा उद्रेक टाळावा. नोकरदारांचं एक प्रकारचं दुष्टपर्व संपणार आहे. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ६ व ७ हे दिवस गुप्तचिंता घालवतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सोमवार मोठ्या लाभाचा.
वृश्चिक : गुरुभ्रमणाची मोठी पकड ता. ७ च्या अष्टमीच्या प्रभावात वाढेल, त्यामुळेच शुक्रभ्रमणाची ताकद आणखी वाढेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती पूर्वसंचितातून लाभ घेतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार नोकरी-व्यावसायिक भाग्यलक्षणांचाच. शनिवारी घरातील वृद्धांना जपा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्ष.
धनू : सप्ताह अष्टमीच्या प्रभावात गुरुभ्रमणाला उजाळा देणारा. सप्तमस्थ बुधभ्रमण त्याला उत्तम साथ देईल. एवंच, ता. ६ व ७ हे दिवस आपल्या राशीस गतिमान असेच, मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत सन्मानाचे, पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक लाभ देणारे.
मकर : मंगळभ्रमणाची लष्करी राजवट सुरू होत आहे, घरात दादागिरी नको! बाकी सप्ताहात व्यावसायिक कर्जवसुली होईल. ता. ६ ते ८ या दिवसांत श्रवण नक्षत्रास नोकरीत विशिष्ट लाभ होतील. वरिष्ठांचा कृपाप्रसाद. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार सरकारी कामांतून लाभदायी. शनिवारी वाहन सांभाळा.
कुंभ : बुद्धिजीवी मंडळींना सप्ताह त्यांच्या उपक्रमांतून छानच राहील. उद्याचा सोमवार हीच लक्षणं दाखवेल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना बुध-शुक्राच्या ओव्हर्स छानच धावा काढून देतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार मोठे लाभ देईल. पुत्रोत्कर्ष. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी प्रवासात सांभाळावं.
मीन : सप्ताहातील मोठी लाभसंपन्नच रास राहील. गुरुवारच्या अष्टमीचा गुरुप्रभाव विलक्षणच राहील. जीवनातील श्रद्धा बळकट होतील. उत्तराभाद्रपदा व्यक्तींना ता. ६ ते ८ हे दिवस पर्वणीसारखे. नोकरीतील उत्साह वाढेल. रेवती नक्षत्रास अंगभूत कलागुणांतून प्रकाशात येईल. प्रेमिकांना उत्तम कनेक्टिव्हिटी मिळेल.