साप्ताहिक राशिभविष्य, १९ ते २५ जून २०२२ : ग्रहांच्या बदलत्या चालींमध्ये हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल. जाणून घ्या..१२ राशींसाठी कसा असेल हा आठवडा.
मेष : सप्ताहातील ग्रहमान नैसर्गिक पाठबळ देणार नाही. प्रवासात बेरंग. ता. २२चा दिवस भरणी नक्षत्रास मोठा विरोधी. बाकी सप्ताहाची सुरुवात अश्विनी नक्षत्रास घरगुती सुवार्तांतून प्रसन्नता राहील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात गुप्त शत्रुपीडा. शनिवार सार्वजनिक जीवनात उपद्रवांचा.
वृषभ : राशीतील शुक्राचं आगमन ग्रहांचा पट ताब्यात घेईल. शिवाय, गुरुबळाच्या पार्श्वभूमीवर सप्ताह निश्चिंत करणारा. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ व २२ हे दिवस अतिशय गतिमान. विवाहाचे प्रस्ताव येतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींचा रुबाब वाढणार आहे. पुत्रोत्कर्षातून धन्यता.
मिथुन : सप्ताह फक्त खेळून काढा. शॉर्टकट नकोतच. बाकी गुरुभ्रमणाची साथ थोरामोठ्यांच्या सहकार्यातून बोलेल. सप्ताहात आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींची एखादी गुप्तचिंता जाईल. मृग नक्षत्राच्या तरुणांना विशिष्ट स्पर्धात्मक यश. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींचा सप्ताह सहकुटुंब मौजमजेचा.
कर्क : सप्ताहाची सुरुवात विचित्र खर्चाची. काहींना उधार-उसनवारी अंगाशी येईल. बाकी लाभस्थानातील बुध-शुक्र ओळखी-मध्यस्थींतून लाभ देणारे. पुष्य नक्षत्राच्या तरुणांचे भाग्योदय थक्क करतील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाच्या शेवटी सार्वजनिक गोष्टीत पडू नये. कलाकारांना सुंदर सप्ताह.
सिंह : सप्ताहातील ग्रहमान वक्री शनीच्या पार्श्वभूमीवर निश्चितच दखलपात्र. संशयास्पद आविर्भाव टाळा. औषधांची रिॲक्शन सांभाळा. बाकी मघा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमणाची पार्श्वभूमी नोकरीत प्रसन्न ठेवेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २२चा बुधवार विचित्र दुखापतींचा. शनिवारी मनाविरुद्ध प्रवास. घरातील गर्भवतींची चिंता.
कन्या : भाग्यातील बुध-शुक्रांची सुंदर खेळी राहील. प्रसन्न गाठीभेटी होतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धापरीक्षांतून मानांकन मिळेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार मानसन्मानातून चकित करणारा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार स्फोटक भांडणांचा. पोलिसांशी हुज्जत टाळा.
तूळ : सप्ताहातील ग्रहांचं फिल्ड नैसर्गिक साथ न देणारंच. सप्ताह काहींना चांगलाच मानवी उपद्रव देईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी क्रिया-प्रतिक्रियांतून सावधच. ता. २२ व २४ हे दिवस मंगळभ्रमणातून हाय व्होल्टेजचे. बाकी स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २० व २१ हे दिवस सरकारी कामांचे.
वृश्चिक : अतिशय सुसंगत ग्रहमानातून जाणारा सप्ताह. सप्तमस्थ शुक्रभ्रमण विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठी निर्णायक अशी शुभफळं देईल. विशिष्ट गुप्तचिंता जाईल. ता. २१चा मंगळवार सुवार्तांतून जल्लोषाचाच. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना एकूणच सप्ताह वैवाहिक जीवनातून प्रसन्न राहील. शनिवारी भुरट्या चोरांपासून सावध.
धनू : सप्ताह ग्रहमानातून अडखळत नेणारा. सप्ताहात वाहनं सांभाळा. भावंडांशी नमतं घ्या. बाकी मूळ नक्षत्रास ता. २० व २१ हे दिवस व्यावसायिक प्राप्तीचेच. घरातील तरुणांची कार्यं ठरतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २२चा बुधवार घरात रुसव्या-फुगव्यांचा. उत्तराषाढा नक्षत्रास सप्ताहाचा शेवट भाजण्या-कापण्याचा.
मकर : सप्ताहात बुध-शुक्राचं सुगंधित पॅकेज राहील. अनेकांचे कौतुक समारंभ होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना बुध-गुरू लाभयोग स्पर्धापरीक्षांतून यश देईल. नोकरीच्या मुलाखतींतून छाप पाडाल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात राजकीय व्यक्तीकडून लाभ. परिचयोत्तर विवाहाचे योग. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार मनस्तापाचा.
कुंभ : सप्ताह संमिश्र स्वरूपाची फळं देईल. कायदेशीर बाबी सांभाळा. सार्वजनिक गोष्टींत पडू नका. बाकी चतुर्थातील शुक्रभ्रमण आणि बुध-गुरूचा लाभयोग बुद्धिजीवी मंडळींना उत्तम संधी देणारा. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना कॅम्पसमधून नोकरी. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना भूखंड मिळेल. ता. २० व २१ हे दिवस एकूणच भाग्यबीजं पेरतील.
मीन : सप्ताहात संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळा. खरेदी-विक्रीत जपा. बाकी सप्ताह बुध-गुरू लाभयोगातून कलाकारांची उमेद वाढवेल. काहींना सरकारी अनुदानातून लाभ. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचा परदेशी भाग्योदय. शनिवारी पाकीट जपा.
















