प्रयागराज (वृत्तसंस्था) आता पुन्हा एकदा प्रयागराज येथील गंगा नदीच्या (Ganga River) किनाऱ्यावर मृतदेहांचा खच दिसत आहे. येथील फाफामऊ घाटावर सध्या भयावह दृश्य पाहायला मिळत आहे. या घाटाच्या चारही बाजूंना असलेल्या भागात मृतदेह दफन केले जात आहेत.
राष्ट्रीय हरित लवाद आणि जिल्हा प्रशासनाने गंगेच्या घाटांवर मृतदेह दफन करण्यास बंदी घातली आहे. मात्र, परंपरेच्या नावाखाली स्थानिक लोकांकडून अजूनही गंगेच्या किनाऱ्यावर मृतदेह दफन केले जात आहेत. विशेषत: फाफामऊ घाटावर दिवसाकाठी १० ते १२ मृतदेह दफन केले जात आहे. मान्सून येण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर हे मृतदेह नदीत वाहून जाण्याचा धोका आहे. तरीही स्थानिक प्रशासनाकडून नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे सध्या येथील परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोना काळात गंगेच्या किनारी मोठ्याप्रमाणावर मृतदेह आढळून आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने हे मृतदेह पुन्हा उकरून बाहेर काढले होते. त्यानंतर या मृतदेहांना अग्नी दिला होता.
फाफामऊ घाटावर अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या लोकांना येथील परिस्थिती भयावह असल्याचे म्हटले आहे. याकडे प्रशासन आणि महापालिका लक्ष देत नसल्याचा आरोप लोक करत आहेत. फाफमऊ घाटावर विद्युत स्मशानभूमी आणि अंत्यसंस्कारासाठी लाकडे असल्यास अशा प्रकारे मृतदेह पुरण्याची गरज भासणार नाही, असे लोकांचे म्हणणे आहे.