सातारा (वृत्तसंस्था) सातारा जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पुजण्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, हा प्रकार स्थानिक युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी आणि तिचे नातेवाईक बेपत्ता झाले आहेत. मुलीच्या मांडीवर कोंबडी ठेवलेला आहे आणि तिच्यावर मांत्रिक वेगवेगळे अघोरी प्रकार करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
वाई तालुक्यातील सुरूर गावाच्या स्मशानभूमीच्या कट्ट्यावर मुलीच्या मांडीवर कोंबडा देऊन मांत्रिकाने पूजन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यावेळी तिच्यासमोर विविध साहित्य मांडल्याचे दिसत होते. यावेळी तिथे गेलेल्या स्थानिक तरुणांना ‘तिला त्रास होत होता म्हणून हे करत आहे, फक्त कोंबडा मारुन नेणार आहोत’ असं एका महिलेने सांगितले. हा प्रकार युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी आणि तिचे नातेवाईक बेपत्ता झाले आहेत.
अल्पवयीन मुलीच्या स्मशानभूमीत पुजनामुळे चर्चेला उधाण आले आहे. वाई तालुक्यातील सुरूर गावाच्या स्मशानभूमीतील घटनेवर अंधश्रद्धा निमुर्लन समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी भुईंज (ता. वाई) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक आशिष कांबळे करत आहेत.