वाशिम (वृत्तसंस्था) वाशिम जिल्ह्यातील अकोला-नांदेड महामार्गावर (Akola-Nanded Highway) खाजगी ट्रॅव्हल्स आणि पाण्याच्या टँकरची एकमेकांस धडक बसल्याने भीषण दुर्घटना घडली. या अपघातात 3 जण ठार झाले आहे तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे.
अकोला-नांदेड महामार्गावर वाटाणे लॉनसमोर आज सकाळीही घटना घडली. अदिती ट्रॅव्हल्सची बस पुण्यावरून यवतमाळ जात होती. तर पाण्याचा टँकर वाशिमकडून मालेगांवच्या दिशेने जात होता. वाटाणे लॉनसमोर ट्रॅव्हल्सची बस पोहोचली असता टँकरची समोरासमोर धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला. या अपघातात टँकर आणि ट्रॅव्हल्स बसचा चालक आणि एक प्रवाशी ठार झाला आहे. तर 8 जण जखमी झाले आहेत. अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचाराकरिता वाशिम शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघात घडल्यानंतर एकमेकांत फसलेल्या दोन्ही वाहनांना क्रेनच्या साह्याने काढण्यात आले. दरम्यान, महामार्गावर दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल दीड तासांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.