चाळीसगाव (प्रातिनिधी) खरीप हंगाम सन २०२३ – २४ महाराष्ट्र राज्यातील ४० तालुक्यांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या निकषानुसार दुष्काळ घोषित करण्यात आला होता, त्यात जळगाव जिल्ह्यातील एकमेव चाळीसगाव तालुक्याचा समावेश झाला असल्याने दुष्काळी तालुक्यांसाठी असणाऱ्या विविध सोयी सवलती चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लागू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील पीकविमा धारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ नुकसानभरपाई खात्यात जमा झाली होती. त्यानंतर राज्य शासनाकडून मिळणाऱ्या मदतीची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. यासाठी देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता, त्याला यश मिळाले असून नुकताच राज्य शासनाने या ४० दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी मदतीचा शासन निर्णय प्रकाशित केला आहे. त्यात चाळीसगाव तालुक्यातील ८४ हजार ४७१ शेतकऱ्यांना जवळपास १३३ कोटी १९ लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे. महिन्याभराच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचे शासन निर्देश असल्याने चाळीसगाव तालुक्यातील ८४ हजार शेतकऱ्यांना दुष्काळात मोठा आधार मिळणार आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने चाळीसगाव तालुक्याला आतापर्यंत प्राप्त दुष्काळी अनुदानांमध्ये १३३ कोटी ही आजवरची सर्वात मोठी मदत मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे..
मदतीची मर्यादा आता २ हेक्टर वरून ३ हेक्टर वर… अनुदान रक्कम देखील वाढवली…
राज्य शासनाच्या धोरणानुसार आतापर्यंत कुठलीही नैसर्गिक आपत्ती, दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास शेतकऱ्यांना २ हेक्टर पर्यत मर्यादेत मदत दिली जात होती, त्यामुळे २ हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. मात्र आता राज्य शासनाने आपले धोरण बदलले असून मदतीची मर्यादा २ हेक्टर वरून ३ हेक्टर केली आहे आहे तसेच प्रति हेक्टरी अनुदान देखील वाढविण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात याचा लाभ मिळणार आहे. त्यात बहुवार्षिक पिके – २२५००/- प्रति हेक्टर, बागायत – १७५००/- प्रति हेक्टर, कोरडवाहू – ८५००/- प्रति हेक्टर अश्या वाढीव दराने शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्यात येईल.
चाळीसगाव तालुक्याच्या इतिहासात प्रथमच १३३ कोटी इतके एकरकमी अनुदान मंजूर केल्याबद्दल भाजपा महायुती सरकारचे आभार – आमदार मंगेश चव्हाण
गेल्या आठवड्यातच सन २०२१ मध्ये महापुरात नुकसान झालेल्या महापूरग्रस्तांना ६ कोटी निधी मिळाला होता. त्यातच आता खरीप हंगामातील दुष्काळग्रस्तांना १३३ कोटी इतका भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. गेल्या १५ वर्षात अनेकदा दुष्काळ, अवकाळी पाऊस संकटे आली मात्र चाळीसगाव तालुक्याला प्रथमच एकरकमी १०० कोटींच्या वर मदत मिळाली आहे. महिन्या भराच्या आत थेट बँक खात्यात हे अनुदान जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळात मोठा आधार मिळणार असून प्रत्येक संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी भाजपा महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे. पुढील काळात चारा छावणी, पाणी टँकरम शैक्षणिक शुल्कमाफी, पीककर्ज पुनर्गठन यामाध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना मदत केली जाणार आहे. सदर भरघोस मदत मंजूर केल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे चाळीसगाव वासीयांच्या वतीने आभार मानतो अशी प्रतिक्रिया चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी यानिमित्ताने दिली