अमरावती (वृत्तसंस्था) अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी माहेरी गेली म्हणून एका नराधमाने सासरवाडीत जावून आपल्या पत्नी आणि सासूबाईवर हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, या हल्ल्यात आरोपीच्या सासूचा मृत्यू झाला आहे. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. संबंधित घटना ही अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा पूर्णा येथे घडली आहे.
या घटनेत ४५ वर्षीय पुष्पा उर्फ रुक्माबाई इंगळे यांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत २५ वर्षीय स्नेहल दिनेश बोरखडे ही महिला जखमी झाली आहे. या घटनेनंतर आरोपी दिनेश बोरखडे हा घटनास्थळावरुन पसार झाला आहे. या दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत उशिर झालेला होता. पुष्पा यांचं निधन झालं होतं. तर त्यांची मुलगी स्नेहल धारातीर्थ पडलेली होती. पोलिसांनी तातडीने पुष्पा यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तर जखमी स्नेहलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण या घटेमुळे तिला खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे.
संबंधित घटनेनंतर पोलिसांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी स्नेहल ही आपल्या माहेरी आई आजारी असल्याने गेली होती. मात्र पत्नी घरी न आल्याने आरोपी दिनेश हा सासरवाडीला गेला. त्याने पत्नीशी सुरुवातीला वाद घातला. सासू यावेळी भांडण सोडायला आली असता त्याने आपल्या सासूवर कुर्हाडीने सपासप वार केले. या हल्ल्यात सासूचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी दिनेशवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाने झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
















