बीड (प्रतिनिधी) – दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही या कारणावरून पत्नीच्या डोक्यात सिमेंट काँक्रीटचा पेव्हर ब्लॉक मारून तिचा खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आता आरोपी पतीविरुध्द दोष सिध्द झाले असून बीड येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांनी त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या आरोपीचे नाव संभाजी शिवाजी वाल्हेकर (रा. फुलेनगर ता. आष्टी) आहे.
या संदर्भात अधिक माहिती असे की, आरोपी संभाजी शिवाजी वाल्हेकर हा दारू पिण्यासाठी त्याची पत्नी निलम हिच्याकडे नेहमी पैसे मागत असायचा. जर पत्नीने पैसे नाही दिले तर तो तिला मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. असे असतानाच १४ एप्रिल २०२३ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास फिर्यादीचा पुतण्या सुरज हा त्याच्या चुलत्याच्या घरी आला व सांगितले की, त्याच्या वडिलांनी त्याच्या आईला डोक्यात दगड मारला असून तिच्या डोक्यातून रक्त येत आहे. त्यानंतर सुरजच्या चुलत्याने घरी जावून पाहिले असता आरोपीच्या घरासमोरील अंगणामध्ये त्यांची भावजयी ही लोखंडी पलंगावर पडलेली होती तर आरोपी संभाजी हा घराच्या भिंतीजवळ बसलेला होता. त्याच्या हाताजवळ एक सिमेंट काँक्रीटचा पेव्हर ब्लॉक होता. फिर्यादीने निलमला आवाज देवून उठवण्याचा प्रयत्न केला परंतु तीने काही एक प्रतिसाद दिला नाही.
याप्रकरणी आरोपी संभाजी वाल्हेकरविरुध्द पत्नीचा खून केल्याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन आष्टी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक निरीक्षक व्ही. पी. देशमुख व त्यानंतर उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांनी या प्रकरणाचा तपास केला. आरोपीविरूद्ध सक्षम पुरावा आढळल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण नंतर बीड जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीसाठी वर्ग झाले. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल अॅड. अजय दि. राख यांनी काम पाहिले त्यांना एम. व्ही. नागमवाड, सहा. पोलीस उपनिरीक्षक, पैरवी अधिकारी यांनी सहकार्य केले.
आरोपीच्या मुलाची साक्ष ठरली महत्त्वाची
या प्रकरणाची साक्षीपुरावा व सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांच्या समोर झाली. आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले होते. यात मयत व आरोपीच्या मुलाची साक्ष महत्वाची ठरली. साक्षीदार, फिर्यादी आणि इतर परिस्थितीजन्य, वैद्यकीय पुरावा, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा यांचा अहवाल यांचे अवलोकन करून व जिल्हा सरकारी वकिल अॅड. अजय राख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने संभाजी शिवाजी वाल्हेकर यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.