जळगाव (प्रतिनिधी) स्वच्छता हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असून सुदृढ आरोग्यासाठी देखील स्व्च्छता आवश्यक असल्याने आपल्या परिसराला शाश्वत स्वच्छतेत टिकवून ठेवण्यासाठी शौचालयांचा वापर करण्याचे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. जागतिक स्वच्छता दिनानिमित्त जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील होते.
जागतिक शौचालय दिनाच्या औषध साधून जिल्हा परिषद आवारात स्वच्छतेबाबत विनोद ढगे व सहकार्यांनी पथनाट्य सादर करून स्वच्छता आरोग्य बाबत जनजागृती केली. तर स्वच्छतेबाबत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा, माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पालकमंत्री गुलाबराव पाटील व व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
२३ हजार कोटींची योजना पूर्ण करणार
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्यातील एकही गाव स्वच्छ पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकारने योजना आखली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे २०२३ पर्यंत तब्बल २३ हजार कोटींची योजना पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत जिल्ह्यात मोठे काम उभे करायचे आहे. पाण्याचा आणि स्वच्छतेचा विषय निघाला तर जळगाव जिल्ह्याचे नाव राज्यभर घेतले जाईल असे कार्य करायचे आहे असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात साडेपाच लाख व्यक्तिगत स्वच्छतागृहे आहेत, आणखी त्यात वाढ होणार होणार असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
दिव्यांगांसाठी स्वच्छतागृह; राज्यात पहिला प्रयोग
ना. पाटील पुढे म्हणाले की, दिव्यांगांसाठी जिल्ह्यात स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून पालकमंत्री यांच्याहस्ते स्वच्छतागृह बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. दिव्यांग कल्याण योजनेंतर्गत हे काम होणार आहे. जलशक्ती मंत्रालयामार्फत राबविण्यात येणार्या योजनेत देशात जिल्ह्याचा तिसरा तर राज्यात पहिल्या क्रमांकाचे पुरस्कार मिळाले आहे. याबद्दल पालकमंत्र्यांनी जि.प.अध्यक्षांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.
जिल्ह्यात मशाल यात्रा
स्वच्छतेचा संदेश जिल्ह्याभरात देण्यासाठी १९ ते २७ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात स्वच्छता मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते मशाल यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील गावागावात जाऊन मशाल यात्र स्वच्छतेचा संदेश देणार आहे.
कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, आरोग्य सभापती रविंद्र पाटील, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जि. प , सदस्य नाना महाजन, अमित देशमुख, अति. मु. का.अधिकारी गणेश चौधरी, ग्रा. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोटे, जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी स्वच्छतेचे महत्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले तर आभार दिगंबर लोखंडे यांनी मानले.