जळगाव (प्रतिनिधी) भाजपमध्ये जाण्याची आता मला कोणतीही घाई नाही तसेच उत्तर महाराष्ट्रात विजयासाठी श्रम घेणारे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन कुठे गेले? असा सवाल करत मंत्री गिरीश महाजन यांना आ. एकनाथराव खडसे यांनी टोला लगावला. ते लोकसभेच्या निकालानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या आधी एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, त्यांच्या भाजप प्रवेशावर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचाराची धुरा आ. खडसे यांनी सांभाळली आणि विजय देखील मताधिक्क्याने खेचून आणला.
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर जळगाव आणि रावेर या दोन्ही जागा आम्ही जिंकल्या आहेत. माझ्या पक्षप्रवेशामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या ठिकाणी आधीच भाजपची ताकद होती, त्यानंतर आमची देखील ताकद झाली, असेही आ. खडसे यांनी स्पष्ट केले.
मागील निवडणुकीत भाजपचे २३ खासदार निवडून आले होते, परंतु यावेळेस त्यांना कमी मतदान झाले आहे. त्याचा फटका राज्यातील महायुतीला बसला. केंद्रात देखील नरेंद्र मोदी यांना बसला आहे. यातच अलीकडच्या काळातील राज्यातील राजकीय वातावरण पाहिले तर ते लोकांना आवडलेले दिसून आले नाही, असेही एकनाथराव खडसे म्हणाले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना एकप्रकारे हा टोला लगावला.