जळगाव (प्रतिनिधी) माझे प्रत्येक पक्षात चांगले संबंध आहेत. त्यामुळे इतरांनी माझ्या वाढदिवसाच्या जाहिरातीत काय टाकावे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून मी स्वत: दिलेल्या जाहिरातीत हा प्रकार नव्हता. यामुळे माझ्या पक्षांतराच्या बाबत दिलेल्या बातम्यांमुळे मला खरं तर राज्यभर चांगली प्रसिध्दी मिळाली, असे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले. ते भाजप कार्यालयात अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती केंद्र शासन बंद करण्याच्या विचारात असल्याचा गैरसमज बाबत घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती केंद्र शासन बंद करण्याच्या विचारात असल्याचा गैरसमज काँग्रेसकडून पसरवला जात आहे. केंद्र शासनाने अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण शिष्यवृत्तीच्या निधीमध्ये ५९ हजार कोटी अशी भरीव वाढ केली असल्याची माहीती भाजपाचे आमदार संजय सावकारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे, महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी, दिपक साखरे, महेश जोशी उपस्थित होते. आ.संजय सावकारे यांनी पुढे सांगीतले कि, आत्तापर्यंत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या “पीएमएस-एससी” या योजनेअंतर्गत उच्च शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती ही पुरेशी नव्हती तसेच या शिष्यवृत्तीच्या वितरणातही भ्रष्टाचाराच्या तक्रारी होत्या.केंद्रीय मंत्रिमंडळाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती निधीमध्ये गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत सर्वोच्च वाढ केली आहे. शिष्यवृत्तीचे वाटप पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी विद्यार्थ्यांची पात्रता,आधार ओळखपत्र, जातीचे प्रमाणपत्र व बँकेचे अध्यक्ष तपशील पडताळून ऑनलाइन (डीबीटी) पद्धतीने निधीचे वितरण करण्यात येणार आहे. सन २०१७ ते २०२० या कालावधीत अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती करिता दरवर्षी ११०० कोटी रुपये निधी दिला जात होता. आता आगामी पाच वर्षात दरवर्षी हा निधी ६ हजार कोटी करण्यात आला आहे. या निधीतील केंद्र सरकारचा वाटा ६० टक्के असून राज्य सरकारांना ४० टक्के खर्च करावा लागणार असल्याचेही सावकारे यांनी सांगीतले. पूर्वी बोगस विद्यार्थी दाखवून निधी लाटण्यात येत असल्याने त्यात आता पारदर्शकता आणल्याचेही शेवटी आमदार सावकारे म्हणाले.