मुंबई (वृत्तसंस्था) मला ईडीचे दुसरे समन्स मिळाले आहे. मी चौकशीला जात आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीचं शपथ घेऊन मी मागेच सांगितलं होतं की मी काही चुकीचं केलेलं नाही, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.
मंत्री अनिल परब आज ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. ईडीसमोर जाण्याआधी अनिल परब यांनी देवाचं दर्शन घेतले. दरम्यान, ईडी कार्यालयात जाण्याआधी पत्रकारांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना परब म्हणाले, दोन समन्स बजावण्यात आले आहेत. अद्याप त्यांनी मला चौकशीसाठी का बोलावलं आहे, हे मला माहिती नाही. चौकशीत माझी पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका असेल, असे ते म्हणाले. मला ईडीचे दुसरे समन्स मिळाले आहे. मी चौकशीला जात आहे. मी शिवसेना प्रमुखांची आणि माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगितले आहे की मी कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम केलेले नाही. चौकशीत मला जे प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तरे दिली जातील. मला अजूनही चौकशीसाठी का बोलावले आहे हे मला माहिती नाही. पण चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य ठेवण्याची माझी भूमिका असेल, असे अनिल परब यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सुरू असलेल्या मनी लाँड्रिग प्रकरणात चौकशी करण्यासाठी अनिल परब यांनाही ईडीने समन्स पाठवले आहे. मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात अनिल परब यांना २० कोटी रूपये मिळाल्याचा निलंबित पोलीस अधिकारी आरोप सचिन वाझे याने केला होता. त्याकरिता ईडी परब यांची चौकशी करणार आहे.