जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातील महावितरणच्या उपविभाग क्रमांक दोन मधील वीज ग्राहकांना डिसेंबर 2024 च्या वीज वापरांची काही देयके वितरित करण्यात आली. सदर विभागासाठी मीटर रिडींग, बिल प्रिंटींग आणि बिल वाटपाचे कंत्राट दिलेल्या मे. राज एंटरप्राईजेस या एजन्सीने नजर चुकीने जूनी जाहिरात मुद्रीत सुमारे हजार ते बाराशे बिले वितरित केल्याची बातमी प्रसार माध्यमात असलेली (शुक्रवारी) प्रसिध्द झाल्याने जनमानसात महावितरणची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री आय. ए. मुलाणी यांनी संबंधित एजन्सीवर करारातील नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश जळगाव मंडल आणि जळगाव विभागीय कार्यालयास दिले आहेत.
जळगाव शहरात मीटर रिडिंग, बिल प्रिंटींग आणि बिल वाटपासाठी मे. राज एंटरप्राईजेस या एजन्सीला कंत्राट दिलेले आहे. या एजन्सीने डिसेंबर 2024 च्या वीज बिल वाटपासाठी जूनी व कालबाह्य स्टेशनरी वापरली असल्याचे वित्त व लेखा विभागाने केलेल्या प्राथमिक तपासात आढळून आले. सुमारे दोन ते तीन हजार वीज बिलांसाठी ती जूनी स्टेशनरी वापरण्यात आल्याचेही आढळून आले. त्या बाबतची बातमी प्रसार माध्यमात प्रसिध्द होईपर्यंत सुमारे हजार ते बाराशे ग्राहकांना बिलावर चुकीची जूनी जाहिरात प्रसिध्द झालेली देयके वितरित झाली होती. प्रिंट झालेली उर्वरित देयके वितरित करण्याचे तत्काळ थांबविण्यात आले असून ती महावितरणकडून तत्काळ ताब्यातही घेण्यात आली आहेत. त्या बाबतचा योग्य खुलासा मागवून संबंधित एजन्सीवर नियमानूसार कारवाई करण्याचे निर्देश जळगाव मंडल कार्यालय, जळगाव शहर विभाग आणि वित्त व लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांना मुख्य अभियंता यांनी शुक्रवार (दि.03 जानेवारी 2025) रोजी दिले आहेत.