मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेसोबतच्या वादामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या अभिनेत्री कंगना रनौत हिने मंगळवारी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर कंगना रानौतने मोठ्या उत्साहात हसतखेळत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असे सांगत कंगनाने शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला.
यावेळी कंगना हिरवी साडी, नाकात नथ आणि केसात माळलेला गजरा अशा पारंपारिक मराठमोठ्या वेषात आली होती. यावेळी प्रसारमाध्यमांनी तिला संजय राऊत यांच्या पत्नीला आलेल्या ईडीच्या नोटीसविषयी विचारणा केली. तुम्हाला मुंबईत परवानगी नाकारणाऱ्यांना ईडीची नोटीस आली त्याबद्दल काय वाटते, असे कंगनाला विचारण्यात आले. मात्र, कंगना रानौतने त्यावर बोलायचे टाळले. अखेर रविवारी कंगना पुन्हा मुंबईत परतली होती. सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात कंगना आणि तिच्या कुटुंबातील काही सदस्य रविवारी मुंबई विमानतळावर दाखल झाले होते.